नवी मुंबई : आधुनिकतेची कास धरत नवी मुंबई पोलीस देखील आॅनलाइन झाले आहेत. पोलीस ठाण्याच्या माहितीसह विविध प्रकारचे अर्ज देखील पोलिसांच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना पोलिसांपर्यंत सहज पोहोचता येणार असल्याचा विश्वास पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी व्यक्त केला.नवी मुंबई पोलिसांनी स्वत:चे संकेतस्थळ सुरू केले आहे. याचे उद्घाटन पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या हस्ते सोमवारी पोलीस आयुक्तालयात करण्यात आले. याप्रसंगी गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत, उपआयुक्त सुरेश मेंगडे उपस्थित होते. हे संकेतस्थळ नागरिकांना अधिकाधिक उपयुक्त कसे ठरेल याची खबरदारी त्यामध्ये घेण्यात आली आहे. त्यानुसार आयुक्तालय हद्दीतल्या सर्व पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस तसेच इतर अधिकाऱ्यांची माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. त्याशिवाय घरफोडी, सोनसाखळी चोरी व इतर गुन्हे घडण्याचे टाळण्यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घ्यायची याचीही माहिती त्यामध्ये आहे. त्यामुळे शहरातला प्रत्येक नागरिक घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधू शकणार आहे. नागरिकांना आपल्या समस्या थेट आयुक्तांपर्यंत पोहोचवता याव्यात याकरिता एक विशेष लिंक देण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येक जण आपली तक्रार नोंदवू शकणार आहे.शस्त्र परवान्यासह इतर विविध प्रकारच्या परवाना प्रक्रियेची माहिती देखील संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. तर घरे भाड्याने देताना भाडोत्रीची माहिती देण्याचे आवाहन करूनही पोलिसांना घरमालकांचा प्रतिसाद लाभत नाही. यामुळे एखादी गुन्हेगार व्यक्ती घर भाड्याने घेवून शहरात सहज राहू शकते. मात्र अशा भाडोत्रीने केलेल्या गुन्ह्यामुळे घरमालक देखील अडचणीत येत आहेत. त्यामुळे शहरातल्या भाडोत्रींची माहिती सहज उपलब्ध व्हावी याकरिता संकेतस्थळावर आॅनलाइन फॉर्म देण्यात आला आहे. त्यामध्ये घरमालक भाडोत्रीची माहिती भरून भविष्यातले संकट टाळू शकणार आहे, तर चोरीची वाहने सहज ओळखता यावीत याकरिता संपूर्ण भारतातून चोरीला गेलेल्या वाहनांची माहिती नवी मुंबई पोलिसांनी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)
नवी मुंबई पोलीस आॅनलाइन
By admin | Published: November 11, 2015 12:27 AM