नवी मुंबई पोलिसाने नेपाळमधील शिखर केले सर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 01:40 AM2019-05-04T01:40:16+5:302019-05-04T01:40:39+5:30
कामगिरीचे कौतुक : नवी मुंबई पोलिसांचा नावलौकिक वाढवला
नवी मुंबई : कोपरखैरणे पोलीसठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने नेपाळच्या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. त्याठिकाणी झेंडा फडकवून नवी मुंबईपोलिसांचा नावलौकिक वाढवला. त्यांनी यापूर्वीही अशा मोहिमा केल्या आहेत.
माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या नवी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याने नेपाळमधील आयलंड पिक शिखर यशस्वीरीत्या सर केले आहे. संभाजी नारायण गुरव असे त्यांचे नाव असून ते कोपरखैरणे पोलीसठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी गिर्यारोहणाचा छंद जोपासत आजवर अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. अशाच प्रकारे नेपाळमधील आयलंड पिक हे शिखर सर करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त संजय कुमार, सह आयुक्त सुरेशकुमार मेकला, उपआयुक्त सुधाकर पठारे यांनी या मोहिमेसाठी गुरव यांना हिरवा कंदील दाखवला होता, तसेच त्यांच्याकडून हे शिखर सर केले जाईल असा विश्वासही व्यक्त केला होता. त्याप्रमाणे गुरव यांनी आयलंड पिक शिखर सर करून त्याठिकाणी झेंडा फडकवून नवी मुंबई पोलिसांचा नावलौकिक वाढवला आहे.
या मोहिमेला ७ एप्रिलला सुरुवात केल्यानंतर २० एप्रिलला ते २० हजार ३०० फुटांच्या शिखरावर पोहचले. यादरम्यान त्यांना बर्फाने आच्छादलेल्या उणे २५ डिग्रीच्या थंडीला सामोरे जावे लागले. असे अनेक थरारक अनुभव घेत त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसह हे शिखर सर केले. ते केवळ उराशी बाळगलेल्या जिद्देमुळे शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या कामगिरीबद्दल पोलीस दलाकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर भविष्यात माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. यात देखील ते यशस्वी होतील असा विश्वासही सर्वांकडून व्यक्त होत आहे.