"घटनेच्या ठिकाणी दोघांचे भेटायचं ठरलं होतं, पण..."; यशश्री शिंदे प्रकरणात पोलिसांचा नवा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 01:40 PM2024-07-30T13:40:25+5:302024-07-30T13:40:49+5:30
Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे.
Yashashree Shinde Murder Case : नवी मुंबईच्या उरण येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने कर्नाटकातून या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला (२४) अटक केली आहे. कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर टेकडी परिसरातून पोलिसांनी दाऊद शेखला ताब्यात घेतलं. २५ जुलै रोजी यशश्री शिंदे निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिचा मृतदेह उरण रेल्वे स्थानकाजवळ सापडला होता. या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत मोठ्या प्रमाणात नवी मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. मात्र आता पोलिसांनी याप्रकरणात धक्कादायक माहिती दिली आहे.
यशश्री शिंदे हत्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक केली. शेखच्या अटकेनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. शेखला नवी मुंबईत आणण्यात येत असून त्याची पुढील चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान हत्याकांडाच्या आधीचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून त्यामध्ये दाऊद शेखने यशश्रीचा पाठलाग केल्याचे दिसून येत आहे.
"पीडितेच्या वडिलांनी २५ तारखेला ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. शुक्रवारी रात्री आम्हाला तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर शनिवारी सकाळी आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला. आज पाचवा दिवस आहे. या प्रकरणात आठ पथकं काम करत होती. नातेवाईक आणि मित्रांच्या चौकशीत तसेच तांत्रिक तपासात या प्रकरणात आम्हाला २ ते ३ संशयित सापडले होते. त्यानंतर आज सकाळी दाऊद शेख या मुख्य संशयिताला ताब्यात घेतलं आहे," अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली.
"मयत आणि आरोपीत ओळख, मैत्री होती. पण मागील तीन ते चार वर्षांपासून ती त्याच्या संपर्कात नव्हती. यातूनच त्याने हे कृत्य केलं असावं असं दिसत आहे. अजून पूर्ण चौकशी झालेली नाही, त्यामुळे नेमकं सांगणं थोडं कठीण आहे. मात्र घटनेआधी दोघांचा संपर्क झाला होता. घटना घडली त्या ठिकाणी त्यांचे भेटण्याचं ठरलं होतं. यात अपहरण वैगेरे काही नाही. ते एकमेकांना ओळखत होते. वाद झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला अशी शंका आहे," असेही दीपक साकोरे म्हणाले.