नवी मुंबई : संपर्क साधायचा होता पोलिसांना; सामना झाला ऑनलाईन गुन्हेगारांशी
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 25, 2024 06:39 PM2024-04-25T18:39:22+5:302024-04-25T18:39:30+5:30
कोपरखैरणे येथील महिलेने ऑनलाईन पोलिसांचा नंबर शोधला असता तिला गुन्हेगाराचा नंबर मिळाला.
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील महिलेने ऑनलाईन पोलिसांचा नंबर शोधला असता तिला गुन्हेगाराचा नंबर मिळाला. त्यावर महिलेने संपर्क साधला असता नोंदणीच्या व शुल्कच्या बहाण्याने संबंधिताने खात्यातले ८२ हजार रुपये उडवून संपूर्ण खाते रिकामे केले. कोपरखैरणे परिसरात राहणाऱ्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. सदर महिलेला एका घटनेची पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार करायची होती. यामुळे महिलेने घरबसल्या पतीच्या मोबाईलवरून पोलिसांचा ऑनलाईन नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिला गुगलवर एक नंबर मिळाला असता त्यावर त्यांनी संपर्क साधला.
यावेळी फोनवरील व्यक्तीने तक्रार नोंदवण्यासाठी लिंक पाठवून त्यावर माहिती भरण्यास सांगितले. शिवाय नोंदणी शुल्क २ रुपयांसाठी देखील त्याने लिंक पाठवली होती. संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर महिलेला आपली फसवणूक होत असावी असे वाटल्याने त्यांनी कार्ड ब्लॉक केले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांनी नवीन कार्ड घरी आल्यावर त्याद्वारे व्यवहार करताना बँक खात्यात रक्कम शिल्लक नसल्याचे समोर आले. यामुळे खात्यातले व्यवहार तपासले असता पोलिस नोंदणीच्या बहाण्याने माहिती मिळवणाऱ्याने त्याचवेळी खात्यातले ८२ हजार रुपये उडवल्याचे समोर आले. याप्रकरणी त्यांनी केलेल्या तक्रारीवरून कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.