नवी मुंबई : पोलिसांच्या पत्नींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तालयामार्फत त्यांना गृहउद्योग प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत अद्यापपर्यंत ५० महिलांनी २० प्रकारचे मसाले बनवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचा हा मसाला ग्राहकांपर्यंतच पोचवण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फतच विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.नवी मुंबई पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात सीबीडीच्या पोलीस वसाहतीमध्ये हा उपक्रम राबवला. शासकीय संस्थेमार्फत त्यांना विविध प्रकारच्या गृहउद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये ५० हून अधिक पोलीसपत्नींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यांनी २० हून अधिक प्रकारचे मसाला बनवण्याचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. दर्जेदार उत्पादन बनवण्यासह ते विक्रीचेही प्रशिक्षण पोलिसांच्या कुटुंबातील महिलांना देण्यात आले आहे. त्यानुसार प्रशिक्षणानंतर प्रथमच बनवलेले हे मसाले बाजारात उपलब्ध करून पोलीसपत्नींना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्याचा आयुक्तालयाचा प्रयत्न आहे.पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा उपायुक्त दिलीप सावंत यांच्या विशेष प्रयत्नाने हा संकल्प राबवण्यात आला. त्याकरिता पोलीसपत्नींचे बचतगटदेखील बनवले जात आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून त्यांच्या मसाला उत्पादनावर अधिकाधिक भर दिला जाणार आहे. महापालिकेतर्फे बचत गटांनी बनवलेल्या उत्पादन विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातात. याचाही लाभ त्या स्वावलंबी पोलीसपत्नींना होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
नवी मुंबई पोलिसांचा कौटुंबिक ‘मसाला‘
By admin | Published: February 04, 2016 2:42 AM