नवी मुंबई- सानपाडा सेक्टर ११ मधील बँक ऑफ बडोदावर भुयार खोदून दरोडा टाकण्यात आला. शनिवार-रविवार दोन सुट्टीचे दिवस पाहून हा दरोडा पडला होता. सोमवारी सकाळी, १३ नोव्हेंबरला बँक उघडल्यावर दरोड्याचा प्रकार उघडकीस आला. भक्ती रेसिडन्सी या इमारतीमध्ये बँक ऑफ बडोदाची जुईनगर शाखा असून त्याच इमारतीच्या शॉप क्रमांक ७ मधील बालाजी जनरल स्टोअर्समधून हे भुयार खोदण्यात आले आहे.पाच ते बारा फूट खोल, अडीच फूट रुंद आणि अंदाजे ४५ ते ५० फूट लांबवर हे भुयार खोदण्यात आले आहे. बालाजी जनरल स्टोअर्स हे शरद कोठावळे यांच्या मालकीचे असून, ते गेनाप्रसाद यांना चार महिन्यांपूर्वी भाड्याने देण्यात आले होते. भुयार खोदताना माती पसरू नये यासाठी भुयारात सर्वत्र लाकडी प्लाय लावण्यात आले होते. बँकेत एकूण २३७ लॉकर असून, त्यातील ३० लॉकर तोडण्यात आले आहेत. कोणते लॉकर तोडण्यात आले आहेत तेही बँकेने प्रसिद्ध केले आहे. सुमारे ७० हून अधिक लॉकर तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता. त्यामध्ये ३० लॉकर फोडण्यात त्यांना यश आले. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली असून अन्य त्यांचा साथीदार गेनाप्रसाद हा दरोडा टाकण्यापूर्वीच एक महिना अगोदर मेंदूच्या आजाराने मयत झाला होता.सानपाडा, सेक्टर-११ येथील बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर शाखेवर अंडरग्राऊंड भुयाराच्या माध्यमातून दरोडा टाकून फरारझालेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील आतापर्यंत श्रावण हेगडे, मोईन खान, हाजी अली मिर्झा बेग, अंजन मांझी उर्फ अंजू यांना गोवंडी बैंगनवाडीतून अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इर्टिगा व काही दागिनेही हस्तगत केले आहेत.संजय वाघ मालेगावचा सोनार, यास दरोड्यातील सोने विकले होते. मोईद्दीन शेख यास कोलकाता हावडा येथून अटक केली, किशन मिश्रा यास उत्तर प्रदेशातून अटक केली आहे, शुभम वर्मा यास अलाहाबाद येथून अटक केली आहे. आदेश वर्मा यासही नवी मुंबई पोलिसांनी अलाहाबाद येथून अटक केली आहे. हाजी अलीची बहीण मेहरून्निसा हिला पुण्यातून अटक केली आहे.
दहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सात किलो सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये दरोडा पडला असला तरी अशा प्रकारे बँकेवर दरोडा टाकावा यासाठी दरोड्यातील मुख्य आरोपी हाजी अली मिर्झा बेग २०१४ पासूनच दरोड्यासाठी जुळवाजुळव व बँकेचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे. अटकेत असलेल्या दहा आरोपींपैकी सहा जणांना महाराष्ट्रात, तीन जणांना उत्तर प्रदेशात तर एकाला कोलकाता येथे जाऊन अटक केली आहे. पोलिसांची सर्व पथके नवी मुंबईत परत आली आहेत.