नवी मुंबईत मान्सूनपूर्व कामांचा धडाका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:18 AM2018-06-11T04:18:03+5:302018-06-11T04:18:03+5:30
दोन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नवी मुंबई - दोन दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाही महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली मान्सूनपूर्व कामे अद्याप सुरूच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर शहरातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या डागडुजीची कामे हाती घेतली जातात. मे महिन्याच्या अखेरीस ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असते. परंतु यावर्षी ही कामे उशिरा सुरू करण्यात आली. त्यामुळे अनेक भागात नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. विशेषत: ऐरोली व दिघा परिसरात पहिल्याच पावसात नाले तुडुंब भरल्याचे पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे यावर्षी पावसाने लवकरच हजेरी लावली. त्यामुळे सुरू असलेल्या कामांना खीळ बसली.
दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने झालेल्या कामांचे पितळही उघडे पडले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. वृक्ष छाटणी न झाल्याने शहराच्या विविध भागात वृक्ष पडल्याच्या दुर्घटना घडल्या.
पावसाच्या पहिल्याच सरीत रस्त्यांवरील डागडुजी तकलादू ठरली. त्यामुळे ठिकठिकाणचे रस्ते उखडल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे. रविवारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने महापालिकेने पुन्हा या कामांना गती दिली आहे. रस्ते व पदपथांच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
शहरात पाणी तुंबण्याची शक्यता
नालेसफाईचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी वसाहतीअंतर्गत छोट्या नाल्यांतील गाळ उपसण्याचा सोपस्कार पूर्ण केल्याचे दिसून येते. तसेच मोठ्या नाल्यांतील गाळ यावर्षी उपसण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबून त्यातील पाणी वसाहतीत घुसण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.