Navi Mumbai: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान करणार नवी मुंबईतील विकासकामांचे लोकार्पण

By कमलाकर कांबळे | Published: January 2, 2024 08:17 PM2024-01-02T20:17:52+5:302024-01-02T20:18:07+5:30

Navi Mumbai: एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी-न्हावा-शेवा सी लिंकसहचे नवी मुंबईतील नेरूळ-उरण रेल्वेचा दुसरा टप्पा आणि दिघा रेल्वेस्थानकाचे फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

Navi Mumbai: Prime Minister Narendra Modi will inaugurate development works in Navi Mumbai before the Lok Sabha elections | Navi Mumbai: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान करणार नवी मुंबईतील विकासकामांचे लोकार्पण

Navi Mumbai: लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान करणार नवी मुंबईतील विकासकामांचे लोकार्पण

- कमलाकर कांबळे
नवी मुंबई -  एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवडी-न्हावा-शेवा सी लिंकसहचे नवी मुंबईतील नेरूळ-उरण रेल्वेचा दुसरा टप्पा आणि दिघा रेल्वेस्थानकाचे फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सिडकोने तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर नियोजित कार्यक्रमांच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सिडकोने प्रस्ताव मागविले आहेत.

मार्चमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. शिवडी-न्हावा-शेवा-सी लिंकचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे नेरूळ-उरण लोकल मार्गावरील खारकोपर ते उरण हा दुसरा टप्पासुद्धा प्रवासी वाहतुकीस सज्ज आहे. दिघा रेल्वेस्थानक मागील तीन महिन्यांपासून प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहे. या प्रमुख विकास प्रकल्पांसह एमएमआर क्षेत्रातील इतर विविध प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याची योजना आहे.

कार्यक्रमाचा खर्च पावणेतीन कोटी
या नियोजित कार्यक्रमाची तयारी करण्याचे निर्देश सिडकोच्या संबंधित विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर नियोजित कार्यक्रमाच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. या नियोजित कामांत प्रवेश, निर्गमन आणि अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे. त्यासाठी २ कोटी ६५ लाख ७१ हजार ७८६ रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. विशेष म्हणजे हे काम पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. यावरून पंतप्रधानांचा हा नियोजित सोहळा फेब्रुवारी महिन्यातच होईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

Web Title: Navi Mumbai: Prime Minister Narendra Modi will inaugurate development works in Navi Mumbai before the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.