- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - शहरात ठिकठिकाणी असलेले डबके, खदान तलाव मृत्यूचे दरवाजे ठरत आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात अशा ठिकाणी पोहण्यासाठी गेलेले तरुण, मुले बुडण्याचे प्रकार घडतात. त्यानंतरही पावसाळ्यापूर्वीच अशी ठिकाणे बंदिस्त करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. परिणामी मंगळवारी जुईनगर येथील तरुणाचा बळी गेला आहे. या घटनेनंतर तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
पावसाळा आला कि अनेकांना पोहण्याचा मोह अनावर होतो. अशावेळी साचलेले पाणी दिसेल त्याठिकाणी अनेकजण डुबक्या मारत असतात. नवी मुंबईत मोठ्या संख्येने खदान तलाव तसेच बांधकामासाठी खोदलेले खड्डे आहेत. सुरक्षेची कोणतीही ठोस उपाय योजना न राबवता अशी ठिकाणे उघडीच पडलेली असतात. त्यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणी पाणी साचताच त्याठिकाणी पोहण्याची हौस भागवणाऱ्यांची गर्दीत होत असते. त्यातूनच बुडून जीव जाण्याच्या घटना घडत असतात. नवी मुंबईत प्रतिवर्षी अशा घटना घडत असतानाही उघड्यावर असलेले जीवघेणे डबके बंदिस्त करण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
परिणामी मंगळवारी जुईनगर येथे राहणाऱ्या राज सनगरे (२८) याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. तो पट्टीचा पोहणारा असून देखील दारूच्या नशेत बांधकामासाठी खोदलेल्या डबक्यात पोहण्यासाठी उतरला होता. मात्र गाळामध्ये पाय रुतल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सदर ठिकाण धोकादायक असतानाही ते बंदिस्त करण्यात आले न्हवते. यामुळे संबंधित विकासकावर तसेच घटनास्थळाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे. गतवर्षी देखील घणसोली, तुर्भे एमआयडीसी, दिघा, तळोजा, पडघा परिसरात अशा प्रकारच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यानंतरही वर्षानुवर्षे अशी ठिकाणे प्रशासनाच्या नजरेतही दुर्लक्षित राहत असल्याने प्रतिवर्षी अनेकांचे जीव जात आहेत.