‘फिफा’च्या सामन्यांसाठी नवी मुंबई सज्ज, स्टेडिअम परिसरामध्ये सीसीटीव्हीचे जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:33 AM2017-10-06T02:33:11+5:302017-10-06T02:33:27+5:30
‘फिफा’ १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना शुक्रवारी डॉ. डी. वाय. पाटील मैदानामध्ये होणार आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे.
नवी मुंबई : ‘फिफा’ १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना शुक्रवारी डॉ. डी. वाय. पाटील मैदानामध्ये होणार आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. सामन्यांदरम्यान स्टेडिअम परिसरामध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा होत आहेत. स्पर्धेसाठी जगभरातील खेळाडू, क्रीडाप्रेमी शहरामध्ये येत आहेत. यानिमित्ताने शहराचे नाव जगभर जाणार आहे. स्पर्धेदरम्यान कोणत्याही त्रुटी राहू नयेत, म्हणून महापालिका, पोलीस, डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट अॅकॅडमी व सर्व सरकारी अस्थापनांनी दिवसरात्र परिश्रम घेतले आहे. मॅच पाहण्यासाठी येणाºया प्रत्येक प्रेक्षकांची कसून तपासणी केली जाणार आहे. ५० पेक्षा जास्त मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. मैदानामध्ये व बाहेर आवश्यक त्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष वॉर रूम तयार करण्यात आली आहे. सर्व सीसीटीव्हींचे नियंत्रण वॉररूममधून केले जाणार आहे.
स्टेडिअमच्या चारही बाजूला कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बॉम्बशोधक पथक, दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहेत. १३ हजार वाहने उभी करता येतील, अशी व्यवस्था केली असून सर्व वाहतूक पोलीस शुक्रवारी ‘फिफा’च्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. ‘फिफा’साठी सायन-पनवेल महामार्गावरील सर्व खड्डे बुजविण्यात आले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी सुशोभीकरण केले आहे. शहरातील सर्व महत्त्वाचे चौक व रोडवर फुटबॉल खेळतानाच्या प्रतिकृती, फुटबॉल नेट बसविण्यात आली आहेत. महामार्गावरून रोड ओलांडण्याची वेळ येऊ नये यासाठी पत्र्यांचे कुंपण तयार करण्यात आले आहे. स्टेडिअम परिसरामध्ये ई-टॉयलेट बसविले असून, जादा साफसफाई कर्मचारी या परिसरात तैनात केले आहेत.