- नारायण जाधवनवी मुंबई - नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर फ्लेमिंगोंचे अधिवास क्षेत्र असलेल्या दोन पाणथळींवर नवी मुंबई महापालिकेने आपल्या नव्या प्रारूप विकास आराखड्यात निवासी आणि वाणिज्यिक बांधकाम क्षेत्र म्हणून प्रस्तावित केल्यावरून वाद पेटलेला असतानाच अटल सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या (एमटीएचएल) कास्टिंग यार्डसाठी खारफुटीवर भराव टाकून विकसित केलेला १६ हेक्टर क्षेत्राचा संपूर्ण भूखंडच आता निवासी क्षेत्र म्हणून सिडकोने दाखविल्याचा दावा नॅट कनेक्ट फाउंडेशनने केला आहे. यानंतर सिडकोच्या या निर्णयावरून पर्यावरणप्रेमींत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
अटल सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या १६ हेक्टर खारफुटीवर भराव टाकून विकसित केलेल्या जागेवरच सिडकोने बालाजी मंदिरासाठी १० एकरचा भूखंड दिला आहे. आमचा बालाजी मंदिरास विरोध नसून सीआरझेड क्षेत्रावरील बांधकामास विरोध असल्याचे सांगून पर्यावरणप्रेमींनी त्यास विरोध केला आहे. एवढेच नव्हेतर, याविरोधात राष्ट्रीय हरित लवादात याचिकाही दाखल केली आहे. अशातच बालाजी मंदिराच्या याच भूखंडाशेजारी पद्मावती अम्मावरी मंदिराच्या बांधकामासाठी १४,६०० चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड देण्याचे आदेश नगरविकास खात्याने मंगळवारी दिले आहेत. यानंतर याबाबत सखोल चौकशी केली असता आता कास्टिंग यार्डच्या संपूर्ण १६ हेक्टर क्षेत्रावरच सिडकोने नव्याने निवासी क्षेत्र प्रस्तावित केल्याचे सीआरझेड क्षेत्रासाठी लढा देणारे पर्यावरणप्रेमी नॅट कनेक्ट फाउंडेशनचे बी. एन. कुमार यांनी सांगितले.
सीआरझेड वाचविण्याचा निर्धारवास्तविक, कास्टिंग यार्डच्या बांधकामाच्या आधीच्या २०१८ च्या गुगल मॅपशी मंदिर भूभागाची तुलना केल्यास हा भाग खारफुटी आणि पाणथळ क्षेत्रांनी व्यापलेला होता. सिडकोने अण्णा विद्यापीठ चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (आयआरएस)द्वारे हा अहवाल तयार करून तो महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाला परवानगीसाठी सादर केला होता. त्यामध्ये बालाजी मंदिराच्या एकूण भूखंडापैकी २७४८ चौ. मीटर क्षेत्र सीआरझेड १ एच्या अंतर्गत येते (५० मीटर खारफुटीचा बफर प्रभाग). तसेच २५६५६.५८ चौ. मीटर क्षेत्र सीआयझेड २ मध्ये येते. निव्वळ ११५९५ चौ. मीटर क्षेत्र सीआरझेडच्या बाहेर आहे. अशातच आता सिडकोने कास्टिंग यार्डचा हा १६ हेक्टर भूखंडच निवासी बांधकामासाठी प्रस्तावित केल्याची बाब खेदजनक असल्याचे ते म्हणाले. सीआरझेड वाचविण्यासाठी या निर्णयाविरोधात लढा देण्याचा इशारा त्यांनी दिला.