नवी मुंबईकरांनी थकविली तब्बल 64 कोटींची पाणीपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:49 AM2021-02-12T01:49:37+5:302021-02-12T01:49:50+5:30
१८ टक्के पाणीगळती : शासकीय कार्यालयांनीही थकवले बिल
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात दररोज सुमारे १८.२७ टक्के पाणी गळती होत आहे. शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, सिडको कार्यालय, रेल्वे स्थानके, पोलीस ठाणे आदी ठिकाणी केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याची थकबाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असून, थकलेल्या पाणी बिलापोटी महापालिकेला एकूण सुमारे ६४ कोटी ४७ लाख रुपयांचे येणे बाकी आहे.
नवी मुंबई पालिकेच्या स्वतःच्या मालकीचे धरण असल्याने नवी मुंबई शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत नाही. मोरबे धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ८८ मीटर असून, नागरिकांची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज ४५० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. नवी मुंबई शहरात गाव-गावठाण, झोपडपट्टी, शहरी भाग असून, सिडको वसाहती आणि गाव-गावठाणातील घरांना स्वतंत्र नळजोडणी देण्यात आली आहे. शहरातील खासगी गृहसंकुले, सोसायट्याच्या पंप हाऊसमध्ये पाणी पुरवठा केला जातो. झोपडपट्टी भागातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी सार्वजनिक नळांची सुविधा देण्यात आली आहे. पाण्याची चोरी आणि गळती थांबविण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून स्काडा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. तरी अनेक ठिकाणी पाण्याची चोरी आणि गळती मात्र सुरूच आहे. सद्यस्थितीत शहरात दररोज सुमारे १८.२७ टक्के पाणी गळती होत असल्याचे महापालिकेकडून नोंदविण्यात आले आहे. नवी मुंबई शहरातील शासकीय कार्यालये, सिडको, पोलीस ठाणे, एमटीएनएल कार्यालये, रेल्वे स्थानके, शासकीय बँका आदींना महापालिकेच्या माध्यमातूनच पाणी पुरवठा केला जातो; परंतु या कार्यालयांनी गेल्या काही वर्षांपासून पाणी बिलाचा भरणा केलेला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर थकबाकी महापालिकेला येणे बाकी असून, अनेक नागरिकांनी गेल्या वर्षांपासून पाण्याच्या बिलाचा भरणा केला नाही.
२० वर्षांपासून पाणी बिलात वाढ नाही
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिकेला पाणी पुरवठा सुविधेसाठी होणारा खर्च पाण्याच्या बिलामधून वसूल होणे अपेक्षित आहे; परंतु नवी मुंबई शहरात गेल्या २० वर्षांपासून पाणी बिलात कोणत्याही प्रकारे वाढ झाली नाही. त्यामुळे वाढलेल्या खर्चाचा ताळमेळ बसविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी अनेक समस्या येत आहेत.
पाणीकर थकला
नवी मुंबई महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा सुविधेचा सुमारे सुमारे ६४ कोटी ४७ लाख रुपयांचा कर थकला आहे. यामध्ये प्रामुख्याने शासकीय कार्यालयांचा प्रलंबित पाणीकर मोठ्या प्रमाणावर असून, अनेक नागरिकांनीही बिले भरलेली नाहीत.
पाणी गळती रोखण्यासाठी स्काडा यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयांकडे असलेल्या पाणी बिलाच्या थकबाकीसाठी परस्पर सहमतीने समायोजन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- अभिजित बांगर
आयुक्त, न.मुं.म.पा.
महापालिकेच्या हद्दीबाहेर ४० एमएलडी पाणीपुरवठा
पनवेल महापालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दररोज खारघर विभागासाठी १० एमएलडी आणि कामोठे विभागासाठी २५ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो, तसेच मोरबे धरण क्षेत्रात दररोज पाच एमएलडी पाणी पुरवठा केला जातो.