नवी मुंबईमध्ये कोरोनामुक्तीचे प्रमाण घसरल्याने धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 01:29 AM2021-04-18T01:29:22+5:302021-04-18T01:29:54+5:30
एक महिन्यात दहा टक्के घसरण : बरे होण्याचे प्रमाण ९५ वरून ८५ टक्यांवर
- नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाची दुसरी लाट शहरवासीयांसाठी धोकादायक ठरली आहे. नवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. १ मार्चला कोरोनामुक्तीचे प्रमाण ९५ टक्के होेते. त्यामध्ये घसरण होऊन ते ८५ टक्यांवर आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असून अशीच स्थिती राहिली तर रुग्णालयात जागा मिळणार नाही व प्रतिदिन मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने फेब्रुवारीअखेरपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश मिळविले होते. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. मृत्यूदर दीड टक्क्यावर आला होता व फक्त साडेतीन टक्के रुग्ण उपचार घेत होते. शहरातील तीन नागरी आरोग्य केंद्राचा परिसर कोरोनामुक्त झाला होता; परंतु मार्चच्या सुरुवातीपासून झपाट्याने रुग्ण संख्या वाढू लागली व महानगरपालिकेच्या उपाययोजना अपुऱ्या पडू लागल्या. सद्य:स्थितीमध्ये रुग्णालयांमधील बेड अपुरे पडू लागले आहेत. व्हेंटिलेटर्स, आयसीयूमध्ये जागा मिळणे अशक्य होऊ लागले आहे. वेळेत उपचार मिळत नसल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घसरू लागले आहे.
सद्य:स्थितीमध्ये कोरोनामुक्तीचे प्रमाण दहा टक्क्यांनी घसरून ८५ टक्क्यांवर आले आहे. वाशी गाव नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात हे प्रमाण ८० टक्के झाले आहे.
करावे, सीबीडी, जुहूगाव, महापे, सिवूड, पावणे, नोसील नाका, इलठाणपाडा, कातकरीपाडा, चिंचपाडा, इंदिरानगर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरानामुक्तीचे प्रमाण वाढले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. नवीन रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होणार नाहीत व त्यामुळे मृत्यू होणारांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात होती. फेब्रुवारीमध्ये सरासरी १ ते २ जणांचा प्रतिदिन मृत्यू होत होता. सद्य:स्थितीमध्ये सरासरी ५ जणांचा मृत्यू होत असून शुक्रवारी एकाच दिवशी ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
दिघासह घणसोलीमध्ये कोरोनामुक्तीचे प्रमाण ८८%
शहरातील दिघा व घणसोली नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. दोन्ही ठिकाणी ८८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सानपाडा व नेरूळ झाेन एकमध्ये ८७ टक्के, खैरणे, रबाळे, ऐरोली, शिरवणे, तुर्भे परिसरात ८६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.