Navi Mumbai: लाच घेताना वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला अटक
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 9, 2024 06:11 PM2024-10-09T18:11:45+5:302024-10-09T18:12:11+5:30
Navi Mumbai News: एनआरआय पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत विभागाने मंगळवारी मध्यरात्री अटक केली. इमारत दुर्घटना प्रकरणात गुंतवणूकदारला अटक करून त्याच्या मुलाकडे ५० लाखाची मागणी केली होती.
नवी मुंबई - एनआरआय पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत विभागाने मंगळवारी मध्यरात्री अटक केली. ईमारत दुर्घटना प्रकरणात गुंतवणूकदारला अटक करून त्याच्या मुलाकडे ५० लाखाची मागणी केली होती. त्यामध्ये १४ लाख घेतल्यानंतर अधिक १२ लाखाची मागणी करुन ४ लाख रुपये घेताना कारवाई करण्यात आली.
शाहबाज गाव येथे इमारत ढासळल्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. या दुर्घटने प्रकरणी जागा मालक, विकासक यांच्यासोबत गुंतवणूकदार महेश कुंभार याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महेश कुंभार यांचा दुर्घटनेशी संबंध नसतानाही त्यांना जाणीवपूर्वक अडकवले गेल्याचा कुटुंबीयांचा आरोप होता. या गुन्ह्यात सहकार्यासाठी एनआरआय पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश कदम यांनी कुंभार यांच्याकडे ५० लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. तडजोड अंती त्यांनी १२ लाख रुपये स्वीकारले होते असेही तक्रारदाराचा आरोप आहे. त्यानंतर कुंभार यांच्यावर इतर एक कारवाईचा धाक दाखवून त्यांच्या मुलाकडे १२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोड करुन ४ लाख रुपये घेण्याची तयारी कदम यांनी दाखवली होती. मात्र पैशांसाठी त्यांच्याकडून सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या मुंबईच्या मुख्य विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून मंगळवारी मध्यरात्री उलवे येथे सतीश कदम यांच्या राहत्या परिसरात सापळा रचून लाचेचे ४ लाख रुपये घेताना त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पहाटेच्या सुमारास एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.