प्रत्येक आंदोलनानंतर तोडपाणी केलं; मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 04:50 PM2021-08-14T16:50:54+5:302021-08-14T16:53:59+5:30
पोलिसांकडून प्रकरण मिटवण्यासाठी आपल्यासोबत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न होत अहे, असा आरोपही संजीवनी यांनी यावेळी केला आहे.
नवी मुंबई - कामगारांच्या प्रश्नांवर मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिकेविरोधात केलेल्या प्रत्येक आंदोलनानंतर ठराविक रकमेची तोडपाणी केली, असा गंभीर आरोप काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी केला आहे. तसेच अवघ्या 6 ते 7 वर्षात त्यांनी कोणताही उद्योग नसताना कोट्यवधींची संपत्ती कशी जमवली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याच बरोबर, यासंदर्भात आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असेही संजीवनी यांनी म्हटले आहे.
नवी मुंबई - मनसेची आंदोलने तोडपाण्याची? महापालिका विरोधात, कामगारांच्या प्रश्नांवर मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केलेल्या प्रत्येक आंदोलनानंतर ठराविक रकमेची तोडपाणी केली असल्याचा आरोप काळे यांच्या पत्नीने केला.#MNS#GajananKalepic.twitter.com/JJyt5qRwtM
— Lokmat (@MiLOKMAT) August 14, 2021
पत्रकारांशी बोलताना संजीवनी म्हणाल्या, राजकारणात एक वेगळा चेहरा असतो, खरा चेहरा दिसत नाही. राजकारणातला चेहरा मुखवटा असतो. गजानन काळे यांनी कामगारांचे प्रश्न मांडल्यानंतर प्रत्येक कामगाराकडून पैसा घेतला आहे. प्रत्येक कामगारांने एक अमाउंट त्यांना दिली आहे. याशिवाय, पोलिसांकडून प्रकरण मिटवण्यासाठी आपल्यासोबत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न होत अहे, असा आरोपही संजीवनी यांनी यावेळी केला.
नवी मुंबई - पोलिसांकडून प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नीने केला आहे.#MNS#GajananKalepic.twitter.com/e8NnsttKcb
— Lokmat (@MiLOKMAT) August 14, 2021
अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल -
पत्नीच्या तक्रारीवरून मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन काळे यांच्याकडून मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे पत्नी संजीवनी काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते. गजानन काळेंवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळेंचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न; पोलीसांकडून शोध सुरूच -
कौटुंबिक हिंसाचार व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत. पत्नीच्या तक्रारीवरून नेरुळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच काळे भूमिगत झाल्याने त्यांना अटक होऊ शकलेली नाही.
"गजानन काळे यांचे विवाहबाह्य संबंध न थांबल्याने आपण पोलीसांकडे धाव घेतली" -
नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने नेरुळ पोलीसांकडे तक्रार केली आहे. त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह असूनही लग्नानंतर आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय काळे यांच्याकडे भ्रष्टाचाराचा भरमसाठ पैसा येत असतानाही घरखर्चाला मात्र त्यांनी हात आखडता घेऊन आपल्याला सदैव दुर्लक्षित ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच त्यांचे विवाहबाह्य असलेले संबंध देखील न थांबल्याने आपण पोलीसांकडे धाव घेतल्याचे पत्नीचे म्हणणे आहे.
पत्नीनेच केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे काळे यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. तर भष्टाचाराच्या आरोपामुळेदेखील भविष्यात त्यांच्यापुढील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काळेंवर अटकेच्या कारवाईचे संकट असल्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर काळे यांच्याकडून आरोपांचे खंडन केले जाणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे.