नवी मुंबईमध्ये खरेदीसाठी सकाळी गर्दी, दुपारनंतर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:34 AM2021-04-22T00:34:56+5:302021-04-22T00:35:05+5:30

भाजीसह किराणा खरेदीसाठी ग्राहकांची तारांबळ : गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन

In Navi Mumbai, shopping is crowded in the morning and dry in the afternoon | नवी मुंबईमध्ये खरेदीसाठी सकाळी गर्दी, दुपारनंतर शुकशुकाट

नवी मुंबईमध्ये खरेदीसाठी सकाळी गर्दी, दुपारनंतर शुकशुकाट

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ११ वाजेपर्यंतच परवानगी असल्यामुळे शहरवासीयांनी सकाळी भाजीपाला व किराणा दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गर्दीमुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. गर्दी टाळण्यासाठी किमान १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मागणी अनेक ग्राहकांनी केली. सकाळी गर्दी असलेल्या ठिकाणी दुपारी मात्र शुकशुकाट होता. 


शासनाने अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ११ वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे. या नियमांची नवी मुंबईमध्येही अंमलबजावणी सुरू झाली आहे.  निर्बंधांचा पहिलाच दिवस असल्यामुळे ग्राहकांनी जास्त गर्दी केली होती. सकाळी ११ पर्यंत खरेदी उरकण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सकाळी ११ नंतर सर्व दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले. पालिका व पोलिसांचे पथक नियमांची अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्ष देत होते. कारवाईच्या भीतीने दुकानदारांनीही दुकाने बंद केली.


सकाळी ११ नंतर सायंकाळपर्यंत शहरात अपवाद वगळता सर्व ठिकाणी शुकशुकाट होता. सकाळी ज्या ठिकाणी खरेदीसाठी झुंबड होती, तो परिसर दुपारी निर्मनुष्य असल्याचे पाहावयास मिळाले. दुपारी रस्त्यावरील वाहनांची संख्याही कमी झाली होती. काही ठिकाणी मात्र पोलिसांचा ससेमीरा चुकवून काही दुकाने सुरू ठेवण्यात आली होती.


१२ पर्यंत दुकाने उघडी असावी
शासनाने सकाळी ११ पर्यंत खरेदीसाठी परवानगी दिली आहे. ही वेळ अपुरी पडत असून, खरेदीसाठी दुकानांच्या बाहेर गर्दी होत आहे. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन होत असून, कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे किमान १२ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी अनेक नागरिकांनी केली.

दारूची खुलेआम विक्री
शहरातील बहुतांश दारू दुकानांच्या बाहेर चोरून दारू विक्री सुरू आहे. सीवूड व नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरील व इतर अनेक दुकानांच्या बाहेर दिवसभर ग्राहक गर्दी करत होते. दुकानातील कर्मचारी दुकानाबाहेरच दारू पुरवत असल्याचे पाहावयास मिळत होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: In Navi Mumbai, shopping is crowded in the morning and dry in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.