Navi Mumbai: राज्यातील बहिणी केवळ पोस्टवर सुरक्षित, अंबादास दानवेंचा सरकारला टोला
By सूर्यकांत वाघमारे | Published: July 29, 2024 05:53 PM2024-07-29T17:53:32+5:302024-07-29T17:53:59+5:30
Navi Mumbai News: राज्यातील महिला केवळ पोस्टवर असुरक्षित असल्याचा खोचक टोला विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मारला आहे. अक्षता म्हात्रे व यशश्री शिंदे हत्या प्रकरणात तपास जलद गतीने व्हावा या मागणीसाठी ते पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या भेटीसाठी आले होते.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - राज्यातील महिला केवळ पोस्टवर असुरक्षित असल्याचा खोचक टोला विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मारला आहे. अक्षता म्हात्रे व यशश्री शिंदे हत्या प्रकरणात तपास जलद गतीने व्हावा या मागणीसाठी ते पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी राज्याच्या कायदा सुव्यवस्थे बाबत सरकार जागृक नसल्याचे अशा घटनांवरून स्पष्ट होत असल्याचीही टीका त्यांनी केली.
बेलापूर येथील अक्षता म्हात्रे (आगास्कर) यांच्या मारेकरूला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. तर उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येवरून उरणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या दोन्ही घटनांच्या अनुशंघाने विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही गुन्ह्यांमध्ये तपास बारकाईने व्हावा व पीडित कुटुंबाना न्याय देऊन त्यांचे दुःख कमी करण्यास मदत करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली. तर या घटनांवरून गृहमंत्र्यांना भेटून काही होऊ शकणार नसल्याने राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान राज्यात लाडकी बहीण असा गवगवा होत असतानाच बहिणींवर अशा प्रकारे अत्याचार घडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावरून कायदा सुव्यवस्थे बाबत सरकार जागृक नसल्याचीही टीका त्यांनी केली. तर सरकार मजबूत असेल तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात असे म्हणत, सध्या केवळ पोस्टवर महिला सुरक्षित असल्याचीही टीका त्यांनी केली.
यावेळी अक्षता म्हात्रे यांच्या कुटुंबियांसह शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, किशोरी पेडणेकर, संजना घाडी, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रकाश पाटील, सुमित्र कडू, सोमनाथ वास्कर, प्रवीण म्हात्रे, संदीप पाटील, समीर बागवान, महेश कोटीवाले आदी उपस्थित होते. आयुक्तांच्या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयाकडून लागलेल्या बिलाच्या तगाद्यामुळे नरेंद्र गाडे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बिल वसुलीसाठी सक्ती करणाऱ्या केवळ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी व्यवस्थापनावर देखील गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.