नवी मुंबई : नवी मुंबईतील शिवसेनेच्या शाखा ताब्यात ठेवण्याकरिता आता चढाओढ सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत या शाखा बंडखोरांच्या ताब्यात जाऊ नयेत, यासाठी शिवसैनिकांनी फिल्डिंग लावली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात ३० ते ३२ माजी नगरसेवक सामील झाल्यानंतर आता शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याची मोहीम बंडखोरांकडून सुरू होण्याची शक्यता आहे. आम्ही शिवसैनिकच असल्याने या शाखा आमच्याच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. मात्र, नवी मुंबईत यापूर्वी गणेश नाईकांनी वाशीतील मध्यवर्ती कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, तो शिवसैनिकांनी हाणून पाडला होता. या कार्यालयाची जागा नाईक यांच्यासह दिवंगत बुधाजी भोईर यांच्या संयुक्त नावावर आहे. नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हे कार्यालय ताब्यात घेतले होते. मात्र, त्यानंतर शिवसैनिकांनी तेथील साहित्य फेकून पुन्हा ताबा घेतला होता. नंतर विनाकारण वाद नको म्हणून नाईक यांनी मोठ्या मनाने समर्थकांना शांत राहण्यास सांगून हे कार्यालय शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासाठीच राहू दिले आहे.
आता शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. काही दिवसांपासून शिंदे गट हा उद्धव ठाकरे गटावर वरचढ ठरला आहे. एकामागून एक धक्के शिंदे गटाकडून ठाकरे गटाला दिले जात आहेत. दोनच दिवसांपूर्वी नवी मुंबईतील शिवसेनेच्या ३२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे या कार्यालयासह ऐरोली, जुगाव आणि बेलापूर येथील शाखांवर बंडखोर कब्जा करू शकतात. यावर बोलताना उपनगर प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, बेलापूर मतदारसंघात तसा परिणाम नाही. ऐरोलीत थोडाफार परिणाम होऊ शकतो.
मात्र, आम्ही खबरदारी घेऊ. तर शहरात इतर ठिकाणी ज्या शाखा भरतात, त्या पक्षाच्या नावावर नसून त्या-त्या ठिकाणच्या माजी नगरसेवक आणि जुन्या पदाधिकाऱ्यांच्या नावावर आहेत. परंतु, असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत शिवसैनिक शाखांवरील ताबा सोडणार नाहीत, असा दावा बेलापूर मतदारसंघ जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केला.
शिवसेनेत मोठं खिंडारनवी मुंबई शिवसेनेतही खिंडार पडल्याचे दिसत असताना आता नवी मुंबईतील शिवसेनेच्या शाखा ताब्यात ठेवण्यासाठी सर्वांचीच चढाओढ दिसून येत आहे. नवी मुंबईतील शिवसेना बंडखोरांकडे वळू नये यासाठी कंबर कसली जात आहे. शिवसेनेत फूट पडली असली तरी शाखा राखून ठेवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.