नवी मुंबई - अभ्यासाचा तणाव असह्य झाल्याने बारावीच्या विद्यार्थिनीने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुरवातीला विद्यार्थिनीने इमारतीवरून पडल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र चौकशीत ती अभ्यासाच्या तणावात होती असे समोर आल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
विटावा येथील ग्रीनवर्ल्ड सोसायटीत गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर राहणारी कृतिका चव्हाण हि विद्यार्थिनी खाली पडल्याची घटना घडली होती. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी चौकशीला सुरवात केली होती. त्यामध्ये बारावीमध्ये शिक्षण घेणारी कृतिका हि अभ्यासाच्या तणावात होती असे समोर आले आहे. त्यावरून तिने तणावात बेडरूमच्या गॅलरी मधून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यानुसार रबाळे पोलिस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे.