धूलिकणांमुळे नवी मुंबईकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:29 AM2019-11-20T00:29:40+5:302019-11-20T00:29:47+5:30

स्वच्छता अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नवी मुंबईमधील प्रदूषणामध्ये वाढ

Navi Mumbai suffers from dust | धूलिकणांमुळे नवी मुंबईकर त्रस्त

धूलिकणांमुळे नवी मुंबईकर त्रस्त

Next

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नवी मुंबईमधील प्रदूषणामध्ये वाढ होऊ लागली आहे. शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरू लागले आहे. रासायनिक कंपनीच्या दुर्गंधीमुळेही नागरिक त्रस्त झाले आहेत. महामार्गाची दुरुस्ती व शहरातील रस्त्यांच्या कामांमुळेही धूलिकणांचे प्रमाण वाढू लागले आहे.

पाऊस थांबल्यापासून ऐरोली ते बेलापूर दरम्यान धुळीचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी पहाटेपासूनच हवेत धूलिकणांचे प्रमाण जास्त असल्याचे जाणवू लागले होते. सायन-पनवेल महामार्गावर वाशी ते उरणफाटा दरम्यान ठिकठिकाणी रोड दुरुस्तीचे काम सुरू असून सर्वत्र धूळ पसरू लागली आहे. रोडवरील धूळही वाहनांमुळे हवेत पसरत असल्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून रसायनांचा वास येऊ लागला होता. धूळ व रसायनांचा वास यामुळे सानपाडा ते नेरुळ दरम्यान महामार्गावरून जाणाºया प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत होता. डोळ्यांची जळजळ होत होती. प्रवाशांनी लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाच्याही हा प्रकार निदर्शनास आणून दिला. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रतिदिन देशातील प्रमुख शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक प्रसिद्ध केला जातो. सायंकाळी ४ वाजता याविषयी वार्तापत्र प्रसिद्ध केले जाते. मंगळवारी नवी मुंबईमधील हवेची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील सर्वात जास्त धूलिकणांचे प्रमाण मनपा कार्यक्षेत्रामध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे.

स्वच्छता अभियानामध्ये देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. राहण्यायोग्य शहरांच्या यादीमध्येही समावेश झालेला आहे. विविध क्षेत्रामध्ये नवी मुंबईची प्रगती सुरू असताना प्रदूषण थांबविण्यामध्ये मात्र अपयश येऊ लागले आहे. अनेक वर्षांपासून हवाप्रदूषण वाढत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने यांत्रिकपद्धतीने रोडची साफसफाई सुरू केली आहे. रोडच्या दोन्ही बाजूला वृक्षलागवड केली असून, दुभाजकांमध्येही हिरवळ विकसित केली आहे; परंतु सायन-पनवेल महामार्गावरील धूळ साफ केली जात नाही. त्यामुळे महामार्गाच्या परिसरातील धूळ वाढत आहे. याशिवाय महामार्गासह इतर ठिकाणीही रोडचे काम सुरू आहे. इमारतींचे बांधकामही सुरू असून त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढू लागले आहे. महापालिकेच्या २०१८-१९ च्या पर्यावरण अहवालामध्येही धुळीचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट करण्यात आले. एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रदूषण रोखण्यासाठी फारशा उपाययोजना केल्या जात नाहीत. यामुळे शहरातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे गरजेचे
मुंबई शहर आणि उपनगरासह लगतच्या परिसरातील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असते. वाहनांची संख्या वाढत असल्याने साहजिकच ध्वनी आणि वायुप्रदूषणातही भर पडते. वाहनांची संख्या कमी व्हावी, सायकलचा वापर वाढावा, प्रत्येकाने सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर भर द्यावा म्हणून सामाजिक संस्थांसह प्रशासनाकडूनही सातत्याने प्रयत्न केले जातात. मात्र केवळ प्रशासकीय प्रयत्न नाही तर नागरिकांकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळणे अपेक्षित असताना तो मिळत नाही. परिणामी समस्या सुटण्याऐवजी त्यात भरच पडत असल्याचे मत वातावरण फाउंडेशनचे अध्यक्ष भगवान केशभट यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई, बीकेसी, माझगावची हवा वाईट
एकीकडे मुंबईकरांना थंडीचे वेध लागले असतानाच दुसरीकडे मात्र मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावत आहे. हवेची गुणवत्ता नोंदविणाºया ‘सफर’ या संकेतस्थळावर मंगळवारी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मधील हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण अधिक नोंदविण्यात आले आहे. त्याखालोखाल नवी मुंबई आणि माझगावच्या हवेत सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण अधिक असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. एका अर्थाने बीकेसी, नवी मुंबई आणि माझगाव येथील हवा वाईट असून, चेंबूरसारख्या प्रदूषित परिसरातील हवा मात्र समाधानकारक असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे.

कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
नवी मुंबईमधील धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. नैसर्गिक नाल्यांमध्ये कारखान्यांमधील दूषित पाणी प्रक्रिया न करता सोडले जात आहे.
कारखान्यांमधील रसायनांच्या दुर्गंधीमुळे मंगळवारी महामार्गावर व एमआयडीसी परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते.
एमआयडीसीमध्ये प्रदूषण पसरविणाऱ्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत. वारंवार प्रदुषण पसरविणाºयांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उपायायोजनांविषयी माहिती घेण्यासाठी विभागीय अधिकारी अनंत हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.

महापालिकेच्या वतीने प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. यांत्रिक पद्धतीने महत्त्वाच्या रोडची साफसफाई केली जात आहे. महामार्गाचे रुंदीकरण व इतर कामांमुळे त्या परिसरामध्ये धूलिकणांचे प्रमाण वाढत असून, संबंधित यंत्रणांना योग्य उपाययोजना करण्यासाठी कळविण्यात येईल.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नमुंमपा
 

Web Title: Navi Mumbai suffers from dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.