नवी मुंबई : सुपरस्पेशालिटी उपचार नेमके कुणासाठी ? १२ वर्षांनंतरही गरीब रुग्ण उपचारांपासून वंचितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:56 AM2018-02-28T01:56:22+5:302018-02-28T01:56:22+5:30
गरीब रुग्णांवर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी पालिकेने वाशी रुग्णालयातील २० हजार चौरस फूट जागा अल्प किमतीमध्ये हिरानंदानी - फोर्टीज रुग्णालयास २००६ मध्ये दिली आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : गरीब रुग्णांवर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी पालिकेने वाशी रुग्णालयातील २० हजार चौरस फूट जागा अल्प किमतीमध्ये हिरानंदानी - फोर्टीज रुग्णालयास २००६ मध्ये दिली आहे. प्रत्यक्षात १२ वर्षांनंतरही गरीब रुग्णांना याचा लाभ झालेला नाही. एप्रिल २०१५ मध्ये प्रत्येक वर्षी ८०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले. एक वर्षानंतर या धोरणास पुन्हा सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक होते; परंतु तीन वर्षांनंतरही अद्याप सर्वसाधारण सभेला याविषयी माहिती देण्यात आलेली नाही.
नवी मुंबई महानगरपालिका शहरवासीयांच्या आरोग्य सुविधांवर प्रत्येक वर्षी १२५ ते १५० कोटी रुपये खर्च करत आहे. २०१८ - १९ या आर्थिक वर्षासाठी तब्बल २०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एवढा प्रचंड खर्च करूनही नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. माता बाल रुग्णालयांचा कारभार जवळपास ठप्प आहे. आरोग्य सेवेचा सर्व भार वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयावर पडला आहे. नवी मुंबईकरांवर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी २००६ मध्ये हिरानंदानी रुग्णालयाबरोबर करार केला. वाशी रुग्णालयातील तब्बल २० हजार चौरस फूट जागा प्रति चौरस फूट ३ रुपये ७४ पैसे दराने देण्यात आली. एक वर्षात हिरानंदानी रुग्णालयाने ही जागा फोर्टीज हॉस्पिटलला दिली. २००८ मध्ये प्रत्यक्षात रुग्णालय सुरू झाले; परंतु पालिकेचे धोरण ठरले नसल्यामुळे २०११ पर्यंत एकाही रुग्णावर मोफत उपचार मिळू शकले नाही. पालिकेने धोरण ठरविल्यानंतरही गरीब रुग्णांवर तेथील उपचार परवडत नव्हते.
पालिकेने एप्रिल २०१५ मध्ये वर्षाला ८०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करण्याचे सुधारित धोरण तयार केले. एक वर्षासाठी सर्वसाधारण सभेने या धोरणाला मंजुरी दिली होती. शहरवासीयांना याचा लाभ होत आहे का हे तपासून पुढील वर्षी पुन्हा सर्वसाधारण सभेपुढे हा विषय मांडणे आवश्यक होते. पण प्रशासनाने तीन वर्षामध्ये किती रुग्णांवर उपचार केले याचीही माहिती दिलेली नाही व सर्वसाधारण सभेपुढे पुन्हा हा विषय आणलेला नाही. सद्यस्थितीमध्ये पालिकेच्या या योजनेचा लाभ फक्त राजकीय वशिला असणाºयांनाच होत आहे. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री यांचा वशिला असणाºया रुग्णांना पालिकेच्या कोट्यातून फोर्टीजमध्ये पाठविले जात आहे. गरीब रुग्णांना प्रतीक्षा यादीमध्ये थांबविले जात आहे. ज्या गरिबांसाठी ही योजना तयार केली त्यांना सुपर स्पेशालिटी उपचार मिळत नाहीत. नाइलाजाने त्यांना मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे किंवा जादा पैसे देवून खाजगी रुग्णालयांमधून उपचार घ्यावे लागत आहेत. मोफत उपचारांची अनागोंदी सुरू असून त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
माहिती गोपनीय ठेवण्यावर भर
पालिकेने २००६ मध्ये हिरानंदानीबरोबर करार केला. २००८ मध्ये तेथे प्रत्यक्ष फोर्टीज रुग्णालय सुरू झाले. २०११ पासून पालिकेने रुग्ण पाठविण्यास सुरुवात केली. सात वर्षांमध्ये किती नवी मुंबईकरांना याचा लाभ झाला याची माहिती पालिकेने अद्याप कधीच जाहीर केलेली नाही. याशिवाय या योजनेविषयी पालिका रुग्णालय व संकेतस्थळावरही माहिती दिलेली नाही. याविषयी माहिती गोपनीय ठेवण्यावरच जास्त भर दिला जात आहे.
बोगस लाभार्थी
उत्पन्नाचा खोटा दाखला देऊन पालिकेच्या योजनेचा लाभ घेतला जात आहे. यापूर्वी नेरूळमध्ये एक व्यक्तीने खोटा दाखला सादर केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. वास्तविक महापालिका उपचार घेणाºयांची माहिती लपवत आहे. सर्व माहिती खुली केल्यास या याजनेतून गरिबांऐवजी श्रीमंतांनीच लाभ घेतल्याचे स्पष्ट होईल, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
कोट्यवधीचे नुकसान
वाशीतील मध्यवर्ती ठिकाणी असणारी २० हजार चौरस फूट जागा पालिकेने कवडीमोल किमतीने हिरानंदानीला दिली आहे. प्रत्यक्षात या योजनेचा काहीही लाभ गरिबांना झालेला नाही. उपचार घेतलेले रुग्ण त्यांच्यावर होणारा खर्च याचा आकडा व बाजारभावाने रुग्णालयाचे भाडे यांचा ताळमेळ घातल्यास १२ वर्षांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून याकडे कोणीच लक्ष देत नाही.
वशिला असणाºयांनाच लाभ
पालिकेच्या कोट्यातून सर्वसामान्य गरीब रुग्णांवर मोफत सुपरस्पेशालिटी उपचार होणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात गरिबांना त्याचा लाभ होतच नाही. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी यांचा वशिला असणाºयांनाच या योजनेचा लाभ होत आहे. यामुळे ही योजना पूर्णपणे फसली आहे.