Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावरून मार्च २०२५ मध्ये पहिल्या विमानाचे टेकऑफ, मुरलीधर मोहोळ यांची माहिती
By कमलाकर कांबळे | Published: July 13, 2024 07:39 PM2024-07-13T19:39:23+5:302024-07-13T19:40:26+5:30
Navi Mumbai News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल. या विमानतळावरून मार्च २०२५ मध्ये पहिल्या विमानाचे टेकऑफ होईल, असा विश्वास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी असणारे देशातील पहिले विमानतळ असेल. या विमानतळावरून मार्च २०२५ मध्ये पहिल्या विमानाचे टेकऑफ होईल, असा विश्वास नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्यासोबत राज्यमंत्री मोहोळ यांनी शनिवारी विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे.
नवी मुंबई विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. विविध कारणांमुळे रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामाने आता वेग घेतला असून, त्याचा पहिला टप्पा मार्च २०२५ मध्ये पूर्ण करण्याचा निर्धार केंद्र शासनाने केला आहे. या विमानतळ प्रकल्पासाठी वेगवेगळ्या संस्था काम करीत असून प्रत्येकीला तिची जबाबदारी आणि डेडलाइन आखून दिली आहे. त्यानुसार प्रत्येक संस्था डेडलाइन हुकणार नाही, त्यादृष्टीने काम करीत आहे. विशेषत: सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, तीन महिन्यांत त्यांनी जवळपास आठ ते दहा वेळा या प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली आहे.
शनिवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या भेटीप्रसंगी विजय सिंघल यांच्यासह सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, खासदार श्रीकांत शिंदे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे जीत अदानी, मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीजेके शर्मा उपस्थित होते.
विमानतळाची वैशिष्ट्ये
नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारले जाणार आहे. टप्पा क्रमांक १ आणि २ एकत्रित पूर्ण केले जाणार आहे. यात एक टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा टप्पा व्यावसायिक वापरासाठी खुला होईल. याअंतर्गत दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे. तर टप्पा क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये तीन टर्मिनल आणि एक रन वे असणार आहे. या टप्प्यानंतर वार्षिक ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल, असा अंदाज आहे.