- नामदेव मोरेनवी मुंबई - प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या लोकनेते दि. बा. पाटील यांच्या चळवळीमधील सर्व दस्तऐवज संकलीत करण्यात येणार आहे. माहितीपट, लघुपट, दुर्मिळ फोटो, वृत्तपत्रामधील कात्रणे, लेख, हस्तलिखीत, स्फूर्तीगितांच्या माध्यमातून हा इतिहास घराघरांमध्ये पोहचविला जाणार असून यासाठी आयोजीत दहा प्रकारच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत १२ हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे.
नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेविषयी संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. स्पर्धेची घोषणा केल्यानंतर त्याला सर्वस्तरातून प्रचंड प्रतिसाद येत आहे. आतापर्यंत १२ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून दि. बा. पाटील यांच्या विविध भावमुद्रा, चळवळीतील प्रसंग चितारले आहेत. स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेवून सहभाग नोंदविण्यासाठी २० डिसेंबर पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला दि. बा. पाटील यांनी चळवळीचे स्वरूप दिले होते. त्यांचे विचार देशभर पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यातील सर्व दस्तऐवज या माध्यमातून संकलीत केले जात आहेत. यासाठीच चित्रकला, लेख स्पर्धा, स्फुर्तीगीत लेखन, जुनी छायाचित्र, वृत्तपत्रांमधील कात्रणे, व्हिडीओ चित्रीकरण, हस्तलिखित पत्र, स्फूर्तीगीत ऑडीओ, व्हिडीओ, माहितीपट, लघुपट या दहा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होत आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून संकलीत होणारे साहित्य भविष्यात चळवळीचा इतिहास अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. समाज माध्यमांवरही हे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या इतिहासावर काही विद्यार्थी पिएचडी करत असून त्यांनाही हे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहितीही पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. २४ ऑक्टोबरला वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रातील सभागृहात एक कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यामध्ये गुणवंत नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय करसन भगत शासकीय योजना केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी रविंद्र वाडकर, प्रशांत निगडे, किशोर पाटील, शैलेश घाग, विवेक भोईर, सुधाकर लाड, गजानन म्हात्रे, रामनाथ म्हात्रे, संजय यादव, देवेंद्र खाडे, वैजयंती भगत, वंदना घरत, हेमंत देसाई उपस्थित होते.