- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - ट्रान्स हार्बर मार्गावर मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. फलाटावर तसेच रेल्वेत देखील मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत. त्यात महिला देखील लक्ष ठरत आहेत. दरम्यान गुन्हा करून पळत असताना दोघांना अटक करण्यात आली आहे.
रेल्वेत होणाऱ्या मोबाईल चोरीच्या घटना मध्यंतरी नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा एकदा चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. ठाणे - वाशी तसेच पनवेल - वाशी रेल्वेमार्गावर मोबाईल चोरीच्या तीन दिवसात सहा घटना घडल्या आहेत. त्यात काही घटनांमध्ये चोरट्यांच्या कृत्यामध्ये महिलांचे थोडक्यात प्राण देखील वाचले आहेत. त्यामुळे चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी रेल्वे पोलिसांना अधिक कंबर कसावी लागणार आहे.
मानखुर्द येथे राहणाऱ्या यास्मिन आरिफ ह्या रात्रीच्या सुमारास सानपाडा स्थानकात उतरल्या होत्या. यावेळी फलाटावर पूर्वतयारीच्या उभ्या असलेल्या एकाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. अशीच घटना शिल्पा यादव यांच्यासोबत घडली आहे. त्या कुर्ला येथून रेल्वेने नेरुळला आल्या असता अज्ञाताने त्यांच्या पर्समधून मोबाईल चोरी केला. तर पनवेल तेथे राहणारे राहुल मिश्रा व त्यांचा मित्र मुंबई फिरून परत पनवेलकडे येत होते. दरम्यान वाशीत ते जेवण करण्यासाठी उतरले असता, रेल्वेच्या दरवाजात उभ्या असलेल्या एकाने दोघांच्या हातातील मोबाईल हिसकावला. कल्याण येथे राहणाऱ्या ओमिनी गुप्ता ह्या घणसोली स्थानकातून ठाणेला जाण्यासाठी लोकलची वाट पाहत होत्या. लोकल आल्यानंतर त्या घाईत लोकलमध्ये चढल्या असता बेंचवर ठेवलेला मोबाईल तिथेच विसरल्या. काही वेळाने त्या परत त्याठिकाणी आल्या असता अज्ञाताने मोबाईल चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
अशाच प्रकारे भिवंडी येथे राहणाऱ्या प्रिया देवाडिगा ह्या रबाळे स्थानकातून ठाणेकडे प्रवास करत होत्या. यावेळी रबाळे स्थानकात एकाने त्यांच्या हातातला मोबाईल हिसकावून रेल्वेतून उडी मारली. यावेळी त्यांनी आरडा ओरडा केला असता स्थानकावर साध्या गणवेशात उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिस, सुरक्षा रक्षक यांनी त्याला रंगेहात पकडले. अजहर हक (२५) असे त्याचे नाव असून त्याच्याकडे चोरीचा मोबाईल मिळून आला. तर खांदेश्वर येथे राहणारे दिनेश चव्हाण हे पनवेल लोकलने प्रवास करत असताना सीवूड स्थानकात एकाने त्यांचा मोबाईल हिसकावला. यामुळे त्यांनी आरडा ओरडा केला असता त्याठिकाणी उपस्थित महिला आरपीएफ जवान व इतरांनी चोरट्याला पकडले. आर्यन बैनवाल (१८) असे त्याचे नाव असून तो सीवूडचा राहणारा आहे. या सर्व घटनांची नोंद वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान हाती लागलेल्या दोन मोबाईल चोऱ्यांकडून इतरही गुन्ह्यांचा उलगडा होतोय का याचा तपास रेल्वे पोलिस करत आहेत. मात्र या घटनांवरून ट्रान्स हार्बर मार्गावरील चोरट्यांचा सुळसुळाट प्रवास्यांची चिंता वाढवत आहे.