- नामदेव मोरेनवी मुंबई - बेलापूरमधील हॉटेल आरूषमधून नवी मुंबई पोलिसांनी तीन बालकामगारांची सुटका केली आहे. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापक मनोहर शेट्टी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने नवी मुंबई परिसरातील बालकामगारांचा शोध घेऊन त्यांची सूटका करण्याचे अभियान सुरू केले आहे. सीबीडी बेलापूर सेक्टर १५ मधील हॉटेल आरूष येथेही बालकामगारांकडून काम करून घेतले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी हाॅटेलमध्ये धाड टाकली. त्या ठिकाणी १६ वर्ष वयाच्या तीन कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. हे तिघेही कामगार झारखंडमधील मुळ रहिवासी आहे. सद्यस्थितीमध्ये बेलापूरमधील हॉटेलच्या स्टाफ रूममध्ये वास्तव्य करत आहेत. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापक मनोहर शेट्टी याच्या विरोधात सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा १९८६ चे कलम ४, १४, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.