नवी मुंबई, दि. 9 - नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकावरुन एका तीन वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण करण्यात आलं आहे. भरदिवसा करण्यात आलेलं हे अपहरण सीसीटीव्हीत कैद झालं आहे. सीसीटीव्हीत आरोपी चिमुरड्याला घेऊन जाताना स्पष्ट दिसत आहे. सीसीटीव्ही पाहिल्यानंतर आरोपी दारुच्या किंवा अंमली पदार्थाच्या नशेत असल्याची शंका येत आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून शोध सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरड्याची आई वाशी रेल्वे स्थानकाजवळ वडापाव विकत घेत होती. आपला मुलगा मागेच उभा असल्याने महिला निश्चिंत होती. मात्र नंतर मागे वळून पाहिल्यानंतर आपला मुलगा जागेवर नसल्याचं पाहून त्यांची धावाधाव सुरु झाली. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार केली. महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी चिमुरड्याला घेऊन जात असल्याचं दिसून आलं.
आरोपीने चिमुरड्याचं अपहरण केल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरुन पनवेलला जाणारी एक वाजून तीन मिनिटांची लोकल पकडली असल्याचंही पोलिसांना सीसीटीव्हीत दिसलं आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.