- नारायण जाधवनवी मुंबई - नवी मुंबईतील पाम बीचवरील डीपीएस फ्लेमिंगो तलाव वाचविण्याची मोहीम दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. याच अनुषंगाने शनिवारी जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाचे औचित्य साधून पर्यावरणप्रेमींनी फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाणथळ जागा वाचवा, त्यामध्ये हस्तक्षेप करू नका, डीपीएस तलाव वाचवा, असे फलक हातात घेऊन मूक मानवी साखळी उभारून आंदोलन केले.
#SaveDPSflamingoLake ची घोषणा करणारे एक मोठे बॅनर, फलक हातात घेऊन आंदोलकांनी फ्लेमिंगोंच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करून आवाज उठवला.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखल्याने ३० एकरांचा डीपीएस तलाव कोरडा पडून धोक्यात आला आहे. नेरूळ जेट्टीच्या बांधकामामुळे या तलावात येणारा भरतीच्या पाण्याचा प्रवाह अडवला गेल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. पाण्याचा प्रवाह रोखल्याने फ्लेमिंगो अन्नाच्या शोधात इतरत्र भरकटत असल्याने आतापर्यंत १० हून अधिक फ्लेमिंगो मरण पावले असून पाच जखमी झाले असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसेच मुख्यमंत्र्यांनी नॅटकनेक्टच्या तक्रारीला प्रतिसाद देऊन तलावातील पाणी अडवण्याच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. परंतु, अद्याप जमिनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही, असे कुमार म्हणाले. नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटीचे संदीप सरीन म्हणाले की, उल्लंघन हे न्यायालयाच्या अवमान असून या संदर्भात आमची संस्था वकिलांशी सल्लामसलत करत आहे. सिडको-वन अधिकाऱ्यांवर कारवाई हवीसेव्ह फ्लेमिंगोज अँड मॅन्ग्रोव्हज फोरमच्या अंजली अग्रवाल म्हणाल्या, “वास्तविक, आम्हाला आशा आहे की, महानगरपालिका, सिडको आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या संकटाचा आढावा घेण्यासाठी या तलावाला भेट दिल्याने तलावातील पाण्याचा प्रवाह पूर्ववत होईल.’’ सिडकोचे अधिकारी इतके निर्दयी आणि बेजबाबदार कसे असू शकतात, असा प्रश्न पारसिक ग्रीन्सचे विष्णू जोशी यांनी केला. बेलापूरचे कार्यकर्ते हेमंत काटकर यांनी खंत व्यक्त करून लोकांनी रस्त्यावर उतरून संबंधित अधिकाऱ्यांना पर्यावरणाच्या ऱ्हासासाठी जबाबदार धरले पाहिजे.