घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई देशात सर्वोत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 02:37 AM2018-05-17T02:37:59+5:302018-05-17T02:37:59+5:30
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबईचा देशात प्रथम क्रमांक आला आहे.
नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबईचा देशात प्रथम क्रमांक आला आहे. पालिका क्षेत्रातील ७५० मेट्रिक टन घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात असून ८५ टक्के कचºयाचे वर्गीकरण केले जात आहे. या कार्याची दखल केंद्राने घेतली असून पुरस्कारामुळे पालिकेचा बहुमान वाढला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदूर, भोपाळ, चंदिगढ या शहरांनी पहिल्या तीन स्वच्छ शहरांचा बहुमान मिळविला आहे. पहिल्या तीनमध्ये येण्याचे नवी मुंबईचे स्वप्न भंगले असले तरी घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात सर्वोत्तम होण्याचा मान मिळाला आहे. महापालिकेने देशातील सर्वोत्तम क्षेपणभूमी तयार केली आहे. शास्त्रोक्त पद्धतीने कचºयाची विल्हेवाट लावली जात आहे. याशिवाय कचरा वर्गीकरणावर विशेष लक्ष दिले आहे. १०० किलोपेक्षा कचरा निर्माण करणाºया सोसायट्या, उद्योग, हॉटेल्स यांना त्यांच्या आवारामध्ये कचºयावर प्रक्रिया करणे सक्तीचे करण्यात आले आहे. पालिकेनेही उद्यानांपासून शाळांपर्यंत सर्व ठिकाणी कचºयावर प्रक्रिया सुरू केली आहे. कचरा वर्गीकरणाचे प्रमाण ८५ टक्के झाले आहे. कचरा वाहतुकीसाठी अत्याधुनिक आरएफआयडी तंत्रप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. अशाप्रकारे तंत्रप्रणाली वापरणारी नवी मुंबई ही देशातील पहिलीच महापालिका आहे. पालिकेने वितरित केलेल्या कचरा कुंड्या व कम्युनिटी बिन्समधील कचरा उचलण्यात आला किंवा नाही याची खातरजमा महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत केली जात आहे. कचरा वाहतूक करणाºया सर्व वाहनांचे जीपीएस व जीपीआरएस नियंत्रण केले जात आहे.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेला जाणारा ओला कचरा प्रक्रिया करून सेंद्रिय खतात रूपांतरित केला जात असून त्या खताला शेतीसाठी चांगली मागणी आहे. सुक्या कचºयामधून प्लास्टिक वेगळे करून प्लास्टिक अॅग्लो तयार केले जातात. ज्याचा वापर प्लास्टिक रिसायकलिंग उद्योगात होत आहे. या अॅग्लोचा वापर करून दहा रस्ते तयार केले आहेत. नवी मुंबईचा घनकचरा व्यवस्थापनामध्ये प्रथम क्रमांक आल्यामुळे महापौर जयवंत सुतार, आयुक्त रामास्वामी एन. यांच्यासह सर्व पदाधिकाºयांनी समाधान व्यक्त केले आहे.
>स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात नवी मुंबई देशात सर्वोत्तम असल्याचा निर्णय हा नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा आहे. याचे सर्व श्रेय संपूर्ण नवी मुंबईकरांचे आहे.
- जयवंत सुतार, महापौर
स्वच्छता सर्वेक्षणामध्ये आलेला नंबर ही अभिमानाची गोष्ट आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून लागलेली सवय ही कायमस्वरूपी रहावी व स्वच्छतेमधील स्थान कायम उंचावत रहावे यासाठी सर्वांनी जागरूक रहावे.
- रामास्वामी एन.,
आयुक्त महापालिका