आरटीई अंतर्गत ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:17 AM2019-04-26T01:17:11+5:302019-04-26T01:17:23+5:30
१६६७ अर्ज पहिल्या सोडतीत यशस्वी : शाळेत प्रवेशाची अंतिम मुदत ४ मे
योगेश पिंगळे
नवी मुंबई : शासनाच्या आरटीई योजनेअंतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून भरण्यात आलेल्या अर्जांपैकी पहिल्याच सोडतीमध्ये तब्बल १६६७ अर्जदार यशस्वी ठरले आहेत. ठाणे जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई शहराने अव्वल स्थान पटकाविले आहे. सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी झाल्यावर प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ४ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलमानुसार अल्पसंख्याक शाळा वगळून मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांमध्ये वंचित गटातील व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली किंवा पूर्वप्राथमिक वर्गात २५ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संख्या वाढली असून मोठ्या प्राणावर अर्ज केले जात आहेत.या योजनेअंतर्गत २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात १४५२, २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात १९१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. महापालिकेच्या माध्यमातून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, यामुळे पालकांचाही मोठा सहभाग लाभला. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी केलेल्या अर्जाची काही दिवसांपूर्वी पहिलीच सोडत काढण्यात आली आहे. यात नवी मुंबईतील तब्बल १६६७ अर्जदार यशस्वी झाले आहेत.
पहिल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असून, यासाठी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. छाननी झालेल्या ८३० विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून पत्रदेखील देण्यात आली आहेत. या यादीमधील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ४५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
२०१९-२० पहिल्या सोडतीमध्ये यशस्वी विद्यार्थी
ठाणे जिल्ह्यातील शहरे शाळा यशस्वी विद्यार्थी
अंबरनाथ ५५ ५२४
भिवंडी (शहरी) २८ ५८१
भिवंडी (ग्रामीण) ३४ ८७
कल्याण (ग्रामीण) ५३ ३२६
कल्याण-डोंबिवली ८१ ७२३
मीरा-भाईंदर ९१ ३६
मुरबाड १५ १८
नवी मुंबई १०५ १६६७
शहापूर ३४ २३७
ठाणे (शहरी) ७६ ५५८
ठाणे (ग्रामीण) ६३ ८६७
उल्हासनगर १७ २७२
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आरटीई कायद्याची नवी मुंबई शहरात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शहरातील पालकांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. पालकांना प्रवेश अर्ज भरण्याकरिता शहरात विविध ठिकाणी केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे पालकांनाही मदत झाली.
- संदीप संगवे, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका