नवी मुंबई : मॅॅफ्कोचा भूूखंड सिडकोच्या ताब्यात, महामंडळ बंद पडल्याने भूखंडांचे हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:01 AM2017-11-17T02:01:13+5:302017-11-17T02:01:19+5:30
महाराष्ट्र कृषी आणि फळ प्रक्रिया महामंडळाचा (मॅफ्को) सानपाडा येथील भूखंड सिडकोने ताब्यात घेतला आहे. महामंडळ बंद पडल्याने मालमत्ता हस्तांतर करून घेण्यात आली आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : महाराष्ट्र कृषी आणि फळ प्रक्रिया महामंडळाचा (मॅफ्को) सानपाडा येथील भूखंड सिडकोने ताब्यात घेतला आहे. महामंडळ बंद पडल्याने मालमत्ता हस्तांतर करून घेण्यात आली आहे. येथील मोडकळीस आलेली इमारत पाडून भूखंडाचे सपाटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. या भूखंडाची निविदा काढून विक्री केली जाणार असून, सिडकोला कोट्यवधी रुपयांचा फायदा होणार आहे.
राज्यातील कृषी प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने मॅफ्को महामंडळाची स्थापना केली होती. राज्यात मुंबई क्रॉफर्ड मार्केट, तुर्भे नवी मुंबई, नांदेड, नागपूर, पुणे व सातारा (कोरेगाव) येथे महामंडळाने प्रक्रिया उद्योग सुरू केले होते. आमरस, भाजीपाल्यावर प्रक्रिया, मांस प्रक्रिया उद्योग सुरू केले होते. प्रक्रिया उद्योगामध्ये मॅफ्को हा ब्रँड जगभर प्रसिद्ध झाला होता. महामंडळामध्ये ७०० कर्मचारी कार्यरत होते; परंतु गलथान व्यवस्थापनामुळे महामंडळाचा तोटा वाढत गेला व टप्प्याटप्प्याने सर्व युनिट बंद करावे लागले. सर्वात शेवटी तुर्भे युनिट बंद करण्यात आले. या ठिकाणी आमरस व वाटाण्यावर प्रक्रिया करण्यात येत होती. २००७मध्ये येथील उत्पादन बंद करण्यात आले. २००९पर्यंत सर्व कर्मचाºयांना स्वेच्छा निवृत्ती योजना लागू करण्यात आली. अखेर ३१ जुलै २०१७ रोजी अधिकृतपणे मॅफ्को महामंडळ बंद करण्यात आले. नवी मुंबईमध्ये मॅफ्कोच्या अंतर्गत प्रक्रिया उद्योग, त्याच्या बाजूचा विस्तीर्ण भूखंड, भाजी मार्केट मिळून जवळपास २२ भूखंड होते. यापैकी २० भूखंडांवर भाजी मार्केट व एपीएमसीला विक्री करण्यात आलेल्या भूखंडांचा समावेश आहे. मॅफ्को महामंडळ बंद केल्यानंतर त्यांच्याकडील मालमत्तांचे काय करायचे याविषयी शासनाने विशेष समिती नियुक्त केली होती. त्या समितीने नवी मुंबईमधील मालमत्ता पुन्हा सिडकोच्या ताब्यात देण्याचे निश्चित करण्यात आले. मॅफ्कोच्या मालमत्तेची किंमत ६२ कोटी रुपये निश्चित करण्यात आली. या मोबदल्यात सिडकोने शासनास भूखंड किंवा इमारत विकसित करून देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणाप्रमाणे सिडकोने सर्व भूखंड ताब्यात घेतले आहेत.
मॅफ्कोचा भूखंड ताब्यात घेतल्यानंतर येथील मोकळ्या भूखंडाची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता; परंतु या ठिकाणी एमएसईबी सबस्टेशन व इतर अडथळे असल्यामुळे ही प्रक्रिया थांबविण्यात आली. सिडकोने येथील धोकादायक घोषित केलेली इमारत, शीतगृह व प्रक्रिया केंद्राची वास्तू पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार दिवसांपासून इमारत पाडण्यास सुरुवात करण्यात आली असून गुरुवारी जवळपास पाडण्याचे काम पूर्ण झाले आहे. इमारतीचे डेब्रिज, लोखंड व इतर साहित्य हटवून भूखंडाचे सपाटीकरण केले जात आहे. सपाटीकरणानंतर भूखंडाची विक्री केली जाणार आहे. मॅफ्को भाजी मार्केटमधील गाळेधारकांचाही सिडकोबरोबर करार करून घेतला जाणार असल्याची माहिती सिडकोच्या अधिकाºयांनी दिली आहे.
आतील अवैध व्यवसाय बंद
मॅफ्को महामंडळाचे तुर्भे युनिट २००९मध्ये पूर्णपणे बंद करण्यात आले. महापालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली होती. येथे सुरक्षारक्षकही ठेवण्यात येत नव्हते. यामुळे या ठिकाणी तृतीयपंथी, देहविक्री करणाºया महिला, अमली पदार्थांचे सेवन करणाºयांचे अड्डे तयार झाले होते. येथील पदपथावरून येणाºया-जाणाºया पादचाºयांना याचा त्रास होत होता. आता सिडकोने इमारत पाडल्यामुळे इमारतीमधील अवैध व्यवसाय थांबले आहेत.
भूखंड हस्तांतरण सिडकोच्या पथ्यावर
मॅफ्को महामंडळाचे सर्व भूखंड सिडकोने हस्तांतर करून घेतले आहेत. या भूखंडाची जवळपास ६२ कोटी रूपये किंमत करण्यात आली आहे. ही रक्कम शासनाला सद्यस्थितीमध्ये द्यायची नसून, त्या मोबदल्यात शासनास भूखंड किंवा इमारत बांधून द्यावी लागणार आहे. वास्तविक सद्यस्थितीमध्ये उपलब्ध भूखंडाची विक्री करून सिडकोला कोट्यवधी रूपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.
भाजी मार्केटसाठी नवीन करारनामा
मॅफ्कोच्या एका भूखंडावर भाजी मार्केट व इतर गाळे आहेत. या गाळेधारकांचे मॅफ्को बरोबर करार होते. आता सर्वांना सिडकोबरोबर करार करावे लागणार असून, त्याविषयीची कार्यवाहीही सुरू केली जाणार आहे. एक भूखंड एपीएमसीच्या ताब्यात असून तो त्यांच्याकडेच राहणार आहे.