ठाणे : अवजड मालाची वाहतूक करणारे ट्रेलर्स चोरून चेसिस आणि इंजीन नंबर बदलणाºया नवी मुंबईच्या एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. चोरीचे नऊ ट्रेलर्स आरोपीकडून हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.कळंबोली येथील राजेंद्रसिंग विलखू (वय ६५) याने बेलापूर येथून विकत घेतलेला ट्रेलर जवळपास ५ वर्षे महाराष्ट्रात चालवला. या ट्रेलरवर परिवहन विभागाचा रस्ता कर मोठ्या प्रमाणात थकीत होता. तो वाचवण्यासाठी राजेंंद्रसिंगने ट्रेलरचा चेसिस आणि इंजीन नंबर बदलला. त्याआधारे त्याने नागालॅण्ड येथील आरटीओ एजंटच्या मदतीने बनावट कागदपत्रे बनवून नागालॅण्ड येथील आरटीओ कार्यालयात नोंदणी केली. गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना या हेराफेरीची माहिती मिळाली. त्यानुसार, माहिती काढून १४ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील पारसिकनाक्याजवळून ट्रेलर हस्तगत करण्यात आला. राजेंद्रसिंगकडे १२ वाहने असून, त्यापैकी ६ वाहनांचे चेसिस आणि इंजीन नंबर त्याने बदललेले आढळले. नवीन नंबरच्या आधारे नागालॅण्ड आणि पंजाबमध्ये आरटीओकडे नोंदणी करून बनावट कागदपत्रे त्याने तयार केली. आरोपी या वाहनांचा वापर ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी करत होता. त्याने साथीदारांच्या मदतीने ६ ट्रकची चोरी करून ते विकले असल्याचेही चौकशीमध्ये स्पष्ट झाले.मालवाहतूक करणाºया अवजड वाहनांना आरटीओचा रस्ता कर भरावा लागतो. इतर राज्यांच्या तुलनेत नागालॅण्डमध्ये या कराचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जमेल तेवढी वर्षे रस्ता कर न भरता वाहने चालवायची. नंतर, चेसिस नंबर बदलून नागालॅण्डमध्ये नोंदणी करायची. नागालॅण्डमध्ये रस्ता कर भरल्यानंतर या वाहनांचा वापर देशभरात मालवाहतुकीसाठी करायचा, असा आरोपीचा गोरखधंदा होता. आरोपीने महाराष्ट्र आणि नागालॅण्ड शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडवल्याचा आरोप अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी केला. चेसिस नंबर बदलून शासनाची फसवणूक केलेले नऊ ट्रेलर्स आरोपीकडे आहेत. त्यापैकी ४ ट्रेलर्स पोलिसांनी हस्तगत केले. उर्वरित ५ ट्रेलर्स गुजरातमधील भूज येथे असून, ते ठाण्यात आणले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.राजेंद्रसिंगविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि श्रीशैल चिवडशेट्टी यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे करीत आहेत.अमलीपदार्थाचा गुन्हा-राजेंद्रसिंग याच्याविरुद्ध जवळपास २२ वर्षांपूर्वी अमलीपदार्थविरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यामध्ये त्याला १० वर्षे कारावासाची शिक्षाही झाली होती. अमलीपदार्थाच्या वाहतुकीमध्येही तो सहभागी आहे का, हे तपासले जात असून त्याच्या साथीदारांची माहिती काढणे सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चेसिस नंबर बदलून ट्रेलर्सची चोरी, नवी मुंबईच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला अटक : नऊ ट्रेलर हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 2:59 AM