Navi Mumbai: तुकाराम मुंढे फ्लेमिंगो मृत्यूची चौकशी करणार, नॅटकनेक्ट तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश
By नारायण जाधव | Published: April 28, 2024 01:16 PM2024-04-28T13:16:08+5:302024-04-28T13:18:08+5:30
Navi Mumbai: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएएस अधिकारी आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नवी मुंबईत नुकत्याच झालेल्या फ्लेमिंगो मृत्यूची चौकशी करण्यास सांगितले आहे.
- नारायण जाधव
नवी मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएएस अधिकारी आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नवी मुंबईत नुकत्याच झालेल्या फ्लेमिंगो मृत्यूची चौकशी करण्यास सांगितले आहे.
एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत १० फ्लेमिंगोच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या आवाहनाला त्वरीत प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांना या समस्येकडे लक्ष देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंढे हे सध्या महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाचे सचिव आहेत.
नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार म्हणाले, “आम्हाला आनंद आहे की सीएमओने तत्परतेने कार्यवाही करून मुंढे यांना निर्देश दिले. कडक आणि प्रामाणिक IAS अधिकारी अशी मुंढे यांची प्रतिमा आहे, असे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार म्हणाले. कुमार म्हणाले कि पर्यावरणप्रेमींना मुंढे यांच्याकडून खूप आशा आहेत कारण ते शहर परिचित आहेत कारण त्यांनी एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केले होते.
डीपीएस तलावाभोवती 10 फ्लेमिंगो मरण पावले आणि पाच जखमी झाले. गुलाबी पक्ष्यांसाठी तो एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून ओळखला जातो. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य (TCFS) येथे भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढते तेव्हा फ्लेमिंगो या आर्द्र प्रदेशात येतात. फ्लेमिंगो फक्त 15 सेमी ते 18 सेमी पाण्यात आरामदायी असतात.
डीपीएस फ्लेमिंगो तलावामध्ये भरतीच्या पाण्याचे प्रवाह गुदमरल्याची तक्रार कुमार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तलावाच्या दक्षिणेकडील खाडीतील मुख्य इनलेट वापरात नसलेल्या नेरुळ जेट्टीसाठी रस्त्याच्या बांधकामासह गाडले गेले आहे. त्यांनी आठवण करून दिली की मनपा स्वतः पाणथळ जागा फ्लेमिंगोचे निवासस्थान आणि पर्यटकांचे आकर्षण म्हणून संरक्षित करण्यास उत्सुक होती आणि या प्रकल्पासाठी बीएनएचएस देखील सहभागी झाली होती. मात्र सिडकोने आतापर्यंत हे काम महापालिकेकडे देण्यास नकार दिला आहे.
सिडकोने सुमारे 25 तलाव नागरी संस्थेकडे हस्तांतरित केले आहेत परंतु डीपीएस फ्लेमिंगो तलाव, एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ जागा राखून ठेवल्या आहेत. आपल्या डीपीमध्ये, सिडकोने दुर्दैवाने हा फ्लेमिंगो तलाव “भविष्यातील विकासासाठी” भूखंड म्हणून राखून ठेवला आहे. सेव्ह फ्लेमिंगो अँड मँग्रोव्हज फोरमच्या रेखा सांखला यांनी सांगितले की, डीपीएस फ्लेमिंगो तलावामधील पाण्याच्या इनलेटच्या पतनासाठी हितसंबंध जबाबदार आहेत.