नवी मुंबई : खाडीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोघेही तळवली परिसरात राहणारे आहेत. संध्याकाळ पासून ते बेपत्ता असल्याने त्यांची शोधमोहीम सुरु होती. यादरम्यान खाडीलगत त्यांचे कपडे आढळून आल्याने रात्रीच्या सुमारास खाडीत शोध घेतला असता मृतदेह हाती लागले.
तळवली येथून निखिल राठोड (14) व कुमार चौहान (15) हि दोन मुले बेपत्ता झाली होती. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास दोघेही घराबाहेर गेले असता रात्री उशिरापर्यंत परत घरी आले नव्हते. यामुळे नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरु होता. यादरम्यान घणसोली येथील साईबाबा मंदिर लगतच्या खाडीकिनारी दोन मुलांचे कपडे व चप्पल आढळून आल्या. यावरून दोघेही पोहायला खाडीत उतरल्याचे अंदाज वर्तवला जात होता. त्यामुळे कोपर खैरणे अग्निशमन दलाला कळवण्यात आले होते.
अग्निशमन दलाचे जवान रोहन कोकाटे, ए. आर. आव्हाड, व्ही. देठे, ए. एस. सकपाळ, के. कीर्तिशाही, आर. मोरे, जे.डी शिरोसे, एस. शिंदे व एस. पार्सेकर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मच्छिमारांच्या बोटीतून रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शोधमोहीम सुरु केली. अखेर अडीच तासांनी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास दोघांचेही मृतदेह हाती लागले. खाडीच्या पाण्यात पोहताना खोलीचा व गाळाचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यानुसार मृतदेह रबाळे पोलीसांच्या ताब्यात देऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे तळवली परिसरात शोककळा पसरली आहे.