Navi Mumbai: वाहनचोरी करणाऱ्या दोघा सराईतांना अटक, जीपीएसमुळे झाली गुन्ह्याची उकल
By सूर्यकांत वाघमारे | Published: July 4, 2024 06:56 PM2024-07-04T18:56:53+5:302024-07-04T18:57:19+5:30
Navi Mumbai Crime News: वाहनचोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. दरम्यान एका गुन्ह्यात चोरीची कार नाशिकला नेली जात असतानाच जीपीएसद्वारे कारचा शोध घेऊन घोटी येथून चोरट्याला अटक केली आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - वाहनचोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये रबाळे एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. दरम्यान एका गुन्ह्यात चोरीची कार नाशिकला नेली जात असतानाच जीपीएसद्वारे कारचा शोध घेऊन घोटी येथून चोरट्याला अटक केली आहे.
शहरात वाहनचोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशाच प्रकारे घणसोलीत राहणाऱ्या व्यक्तीची कार चोरीला गेली होती. ते चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेले असता रस्त्यालगत उभ्या कारमध्येच चावी राहिली होती. याचा फायदा घेऊन चोरट्याने काही क्षणात सदर कार चोरली होती. मात्र हा प्रकार निदर्शनात येताच सदर व्यक्तीने रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली होती. दरम्यान कारमध्ये जीपीएस असल्याने कारच्या ठिकाणाची माहिती तक्रारदार यांच्या मोबाईलवर मिळत होती. यामुळे चोरट्याला रंगेहात पकडण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सुनील वाघमारे यांनी उपनिरीक्षक दीपक शेळके, पोपट पावरा, हवालदार कृष्णात गायकवाड, सतीश बाड, हुसेन तडवी, ईश्वर जाधव यांचे पथक केले होते. त्यांच्याकडून कारच्या ठिकाणाची माहिती मिळवली जात असताना ती घोटी येथे असल्याचे समजले. त्यानुसार पथक कारच्या दिशेने रवाना होत असतानाच त्यांनी नाशिक पोलिसांची मदत घेऊन कार चोरट्याला अटकाव घातला. यामुळे चोरीची कार काही तासात मिळाली, तर योगराज शिनगारे (२६) याला कार चोरी प्रकरणी अटक केली आहे. तो घणसोली सेक्टर २१ येथे राहणारा असून चोरीची कार विल्हेवाट लावण्यासाठी नाशिकला घेऊन चालला होता. त्याच्यावर यापूर्वीचे कल्याण, नाशिक येथे गुन्हे दाखल आहेत.
त्याचप्रमाणे २५ जूनला चोरीला गेलेल्या एका रिक्षाचा पोलिस शोध घेत असताना ती रिक्षा महापे एमआयडीसीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याद्वारे शेळके यांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता. त्यामध्ये रबाळे गाव येथे राहणाऱ्या सागर पाटील याला चोरीच्या रिक्षासह अटक करण्यात आली. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले असून रबाळे व एपीएमसी येथील पूर्वीचे तीन गुन्हे दाखल आहेत.