- नारायण जाधवनवी मुंबई - पाम बीच मार्गावर नेरूळ येथील टीएस चाणक्य येथील फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या जागवेर नवी मुंबई महापालिकेने निवासी व वाणिज्यिक आरक्षण प्रस्तावित केलेले असाताना काही भूमाफियांनी येथील खारफुटी आणि गवताळ जमीन जाळून झोपड्या टाकणे सुरू केले आहे, तर काही महाभागांनी फ्लेमिंगोंना पिटाळण्यासाठी फटाके फोडण्याचे प्रताप केले आहेत.
या प्रकाराबद्दल पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करून वनरक्षकांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. टीएस चाणक्य येथील खारफुटी तोडून तेथील जमीन जाळण्यात आली आहे. या परिसरात मच्छिमारांच्या निवाऱ्याच्या नावाखाली काही भूमाफियांनी झोपड्या बांधणे सुरू केले आहे. हा परिसर पाणथळ म्हणून घोषित करून त्याचे संवर्धन करावे, यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमींनी चळवळ उभी केली आहे. यासाठी मानवी साखळीसह इतर आंदोलने केली आहेत. असे असतानाही भूमाफियांकडून हे प्रकार होत असल्याचे पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांनी सांगितले.