नवी मुंबई : उलवे येथील नवविवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर पती व सासूकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या आई वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलवे परिसरातील मोरावे गावात रविवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे. त्याठिकाणी राहणाऱ्या सलोनी वैभव म्हात्रे (१९) या नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मी महिन्यात तिचा वैभव म्हात्रे (२०) सोबत प्रेमविवाह झाला होता. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचा विवाह लावून देण्यात आला होता. दरम्यान वैभव हा नोकरी, व्यवसाय करत नसल्याने तो पत्नी सलोनी हिला माहेरहून पैसे मागण्यास सांगत होता. शिवाय सासू व दीर देखील वेगवेगळ्या कारणांनी तिचा छळ करत होते. त्यामुळे सलोनीचे आई वडील तिच्या सुखासाठी तिला पैसे देखील पुरवत होते. शनिवारी तिची आई तिच्यासाठी गोड जेवण देखील घेऊन गेली होती. तर रविवारी दुपारी तिचा भाऊ पैसे देण्यासाठी बहिणीच्या सासरी गेला होता. यावेळी घरात कोणीही आढळून आले नव्हते.
काही वेळाने सलोनीला रुग्णालयात दाखल केले असल्याचे त्यांना समजले. यामुळे त्यांनी रुग्णालयात धाव घेतली असता सलोनीचा मृत्यू झाला असून तिने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. प्रेमविवाह करून देखील पतीकडून झालेली निराशा व सासरी होणारा छळ याला कंटाळून तिने आत्महत्या आरोप तिचे वडील देविदास मुंढेकर यांनी केला आहे. त्यानुसार रविवारी रात्री एनआरआय पोलिस ठाण्यात पती वैभव, सासू संगीता व दीर अमोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.