- नारायण जाधवनवी मुंबई - नवी मुंबईतील पाम बीच रस्त्यावरील भूखंडांना कोट्यवधींचे माेल असून, येथील डीपीएस शाळेसमोरील एनआरआय कॉम्प्लेक्सच्या बाहेर एका माेक्याच्या जागेवर बेकायदेशीरपणे उभारलेली रोपवाटिका महापालिकेने पुन्हा एकदा तोडली आहे. मात्र, ती तोडल्यानंतरही लगतच्या भूखंडावर राडारोडा तसाच पडून आहे. यामुळे हा परिसर स्वच्छ करून या ठिकाणी फुलपाखरू उद्यान विकसित करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.
या ठिकाणी फुलपाखरू उद्यान विकसित केल्यास पालक आणि डीपीएस शाळेतील अभ्यागतांना विश्रांतीसाठी हक्काचे ठिकाण होऊ शकते, तसेच स्पर्धा परीक्षा किंवा बोर्ड परीक्षांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तेथे विश्रांती घेता येईल. कारण या भागात आश्रय घेण्यासाठी जागा नाही, अशी सूचना पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांनी केली आहे.
या रोपवाटिकेत रात्री असामाजिक घटकांचा वावर होत असल्याची तक्रार केल्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी फेब्रुवारी महिन्यात ही रोपवाटिका तोडून परिसर अतिक्रमणमुक्त केला होता. मात्र, सुरक्षारक्षक बदलून ती राेपवाटिका पुन्हा उभारल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत अगरवाल यांनी पुन्हा एकदा तक्रार केल्यानंतर महापालिकेने ती तोडली आहे. महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणावर प्रश्नचिन्हमहापालिकेने बेकायदेशीर रोपवाटिका तोडली असली तरी तिच्या लगतच टाकून दिलेले आणि तुटलेले लाकडी फर्निचर, तुटलेल्या काच आणि इतर धोकादायक कचरा अस्ताव्यस्तपणे तसाच पडून आहे. यामुळे डीपीएस सिग्नल परिसरात येणाऱ्या नागरिकांना हे ओंगळवाणे दृश्य नजरेस पडत आहे. शिवाय या परिसरातून अत्यंत दुर्गंधी पसरत असून त्यामुळे या परिसरात उभे राहणे किंवा चालणे कठीण झाले आहे. पाम बीच रोडच्या शेजारी असलेल्या प्रतिष्ठित डीपीएस स्कूल आणि एनआरआय कॉम्प्लेक्सच्या शेजारी ही स्थिती असेल तर महापालिका स्वच्छ सर्वेक्षणात इतके उच्च रँकिंग कसे मिळवते, असा प्रश्न करण्यात येत आहे. याशिवाय डीपीएस शाळेसमोरील याच रस्त्यावर काही जुनी गंजलेली वाहनेही पडून आहेत.