नवी मुंबई - बेलापूर सेक्टर आठ येथील सप्तशृंगी मंदिराच्या पायथ्याशी खानदेश वासियांचा खाद्य मेळावा रविवारी संध्याकाळी पार पडला. या खाद्य मेळाव्यात खानदेशातील प्रसिद्ध वरण बट्टी हा पदार्थ होता.यावेळी महिलांसाठी व बच्चेकंपनीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई, नवी मुंबई रायगड आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुळे,जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खान्देशवासी नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत.या सर्व खानदेश वासियांना वर्षातून एकदा बेलापूर सेक्टर ८ मधील डोंगराच्या कुशीत असलेल्या सप्तशृंगी मंदिराच्या आवारात वरण बट्टी हा उपक्रम राबवला जातो.या उपक्रमाचे संयोजक जितेंद्र रौंदले,रमेश चित्ते ,आदी असून या निमित्ताने डोंबिवली, कल्याण, ठाणे ,रायगड, मुंबई, अंबरनाथ, नवी मुंबई परिसरातील रहिवासी सहकुटुंब या उपक्रमात सहभागी झाले होते.साग्रसंगीत भोजन याचा मनमुराद आनंद लुटत भविष्यातील उपक्रमांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
विविध क्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले.यामध्ये पोलीस निरीक्षक अनिल पाटील,मंत्रालय कक्ष अधिकारी राजेंद्र महाजन ,यासह पोलीस दलातील अधिकारी,कर्मचारी,सिडको मनपा शासकीय आस्थापना विविध व्यवसायात कार्यरत यशस्वी असलेल्या महिला पुरुष यांना गौरविण्यात आले.यापुढे हा उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.