नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध १३ पक्ष आणि संघटना एकत्र आल्या असून येणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवी मुंबई विकास आघाडी सर्वच प्रभागात निवडणुका लढणार असल्याची घोषणा नवी मुंबई विकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. ९ फेब्रुवारी रोजी बेलापूर येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.नवी मुंबई शहरातील सिडको वसाहती, गाव-गावठाण आणि झोपडपट्टी भागात गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्या असून त्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केला असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अफसर इमाम यांनी केला. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवून नागरिकांना न्याय देण्यासाठी लोकशाहीला मानणारे राजकीय पक्ष आणि संघटना एकत्र आल्या असून नवी मुंबई विकास आघाडी केली असल्याचे घर हक्क संघर्ष समितीचे हिरामण पगार यांनी सांगितले. नवी मुंबई विकास आघाडीतील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळावा घेतला जाणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालय सचिव राजेंद्र कोरडे यांनी सांगितले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष ख्वाजामिया पटेल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वराज इंडिया, जनता दल-सेक्युलकर, सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन, बंजारा क्रांती दल, महाराष्ट्र जनशक्ती सेवा, वंचित समाज इन्साफ पार्टी आदी पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई विकास आघाडी सर्व जागांवर निवडणूक लढणार - पदाधिकाऱ्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:55 AM