- कमलाकर कांबळे नवी मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तीन जागांसाठी आज मतदान होणार आहे. त्यासाठी संबधित सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता याव्यात यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील खासगी आस्थापनेवरील मतदारांना मतदान करता यावे यासाठी दोन तासांची विशेष सवलत जाहीर केली आहे.
कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारसंघनिहाय मतदारसंख्या जाहीर केली आहे. त्यानुसार या तिन्ही मतदारसंघात एकूण ३ लाख ५९ हजार ७३७ मतदार बुधवारी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, अधिकाधिक मतदारांना मतदान करता यावे, यासाठी निवडणूक विभागाने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी यापूर्वीच २६ जूनची नैमित्तिक रजा जाहीर केली आहे. परंतु, खासगी आस्थापनेवर काम करणाऱ्या मतदारांना विशेष नैमित्तिक रजा लागू होत नसल्याने त्यांच्यासाठी मतदान कालावधीत दोन तासांची विशेष सवलत दिल्याचे कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी कळविले आहे.
१ जुलैला नेरूळ येथे मतमोजणीमतदार यादी तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी हेल्पलाइन उपलब्ध केली आहे. या हेल्पलाइनद्वारे मतदाराचे नाव कुठल्या केंद्रात आहे किंवा नाही याबाबत माहिती देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. १ जुलै, २०२४ रोजी नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबधित यंत्रणा सज्ज केल्या आहेत.