- नारायण जाधवनवी मुंबई : येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारपेठेत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आग लागल्यानंतर प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल दहा महिने उलटले तरी अद्याप संचालक मंडळासमोर सादर केलेला नाही. यादरम्यान बाजार समितीच्या इतर बाजारपेठांतही आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे एपीएमसी प्रशासन फळ बाजारात लागलेल्या आगीचा अहवाल कधी सादर करणार, याची प्रतीक्षा संचालक मंडळास लागून राहिली आहे. त्यातच संचालक अपात्रतेच्या राजकारणामुळे संचालक मंडळाच्या बैठकीवर वारंवार विरजण पडले असून, ते प्रशासनाच्या पथ्यावरच पडले आहे.
फळ बाजारातील एका गाळ्यात नोव्हेंबर २०२२ मध्ये लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले होते. शिवाय, बाजारपेठेतील अतिक्रमणांसह अग्निसुरक्षेचाही प्रश्न चव्हाट्यावर आला होता. अनेक व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने बांधकाम केले असून, मोकळ्या जागाही सोडल्या नाहीत. त्यातच आहेत त्या मोकळ्या जागांमध्ये पुठ्ठे, लाकडी खोक्यांसह काही ठिकाणी किरकोळ व्यवसायासाठी अतिक्रमण केले आहे. हा प्रकार केवळ फळ बाजारच नव्हे, तर भाजीपाला आणि मसाला, दाणाबंदरातही आहे. मागे सुक्यामेव्याच्या एका दुकानाला आग लागली होती.
समितीने किती भेटी दिल्या, काय निरीक्षणे नोंदविली?फळ बाजारातील आगीनंतर एपीएमसी प्रशासनाने पाच बाजारांतील अधिकाऱ्यांची समिती गठित करून पाचही बाजारपेठांतील अग्निसुरक्षेसह इतर सुरक्षिततेच्या बाबतीत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या समितीने कोणत्या बाजारपेठांना कधी आणि किती भेटी दिल्या, काय निरीक्षणे नोंदविली, काय उपाय सुचविले, त्या आगीची कारणे कोणती होती, याविषयीच्या अहवालाची संचालक मंडळास प्रतीक्षा आहे.