नवी मुंबई: पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नवी मुंबईलाही झोडपले. दिवसभर शहरात पाच वृक्ष कोसळले. ठिकठिकाणी पाणी साचले होते. भुयारी मार्गही जलमय झाले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारावरही पावसाचा परिणाम झाला होता. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
नवी मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. ठाणे बेलापूर रोडवरील सवीता केमीकल, सीबीडी बसडेपो, इंदिरानगर ते महापे रोडवर दोन ठिकाणी, मॅफ्को मार्केट, शिरवणे, सानपाडा भुयारी मार्गात पाणी साचले होते. एमआयडीसीमध्ये बोनसरीजवळील रोडवरही पाणी साचले होते. जवळपास एक फूट पाणी रोडवर असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. सीबीडी सेक्टर ११, ऐरोलीतील गणपती मंदिर व शहरात एकूण ५ ठिकाणी वृक्ष कोसळले. दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास ४.२५ मीटरची भरती असल्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या असून पावसामध्ये शहरातील विविध भागांची पाहणी करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही ग्राहकांची संख्या कमी झाली होती. शहरातील जनजीवन विस्कळीत झाले हाेते. दुपारी रोडवरील वाहनांची संख्याही कमी झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. शहरातील विभागनिहाय पावसाची नोंद
- विभाग - पाऊस (मीमी )
- बेलापूर - ९९.६
- नेरूळ - ८४.१
- वाशी ६४.३
- कोपरखैरणे - ४५
- ऐरोली - ६७
- दिघा ७९