नवी मुंबईचे ५९ दशलक्ष लीटर पाणी मिळवणार
By Admin | Published: January 21, 2016 02:33 AM2016-01-21T02:33:13+5:302016-01-21T02:33:13+5:30
जादा पाणी वापरणाऱ्यांना दंड ठोठावणे, जुन्या इमारतींनाही रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करणे, कल्याण-डोंबिवलीच्या हक्काचे असूनही गेली
कल्याण : जादा पाणी वापरणाऱ्यांना दंड ठोठावणे, जुन्या इमारतींनाही रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करणे, कल्याण-डोंबिवलीच्या हक्काचे असूनही गेली आठ वर्षे नवी मुंबईला जाणारे ५९ दशलक्ष लिटर पाणी मिळवण्यासाठी जीआर काढण्याचा आग्रह राज्य सरकारकडे धरणे असे महत्त्वपूर्ण निर्णय घेत मंगळवारी पाण्याच्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली.
कल्याण-डोंबिवलीला पाणी पुरवणाऱ्या धरणात मार्चपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने आणि ३० टक्के पाणीकपात लागू करूनही जुलैपर्यंतची पाणी परिस्थिती चिंताजनक असल्याने पालिका प्रशासनाने हा २५ कोटी ५२
लाखांचा आराखड्याला तयार केला आहे.
पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी महिला नगरसेविका सरसावल्या होत्या. कृती आराखड्यात तत्काळ मंजुरी देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आणि त्यामुळे सर्वानुमते त्याला मंजुरी देण्यात आली.
दोन टप्प्यातील कृती आराखडा...
पाणी टंचाईचा कृती आराखडा दोन टप्प्यांत करण्यात आला आहे. जानेवारी ते मार्च आणि मार्च ते जून अशा दोन टप्प्यांत हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरातील विहिरीतील गाळ काढणे, वाढीव टँकरने पाणीपुरवठा करणे, नळपाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती, नव्या बोअरवेल खोदणे, तात्पुरती नळ पाणीपुरवठा घेणेअशा कामांवर जवळपास १२ कोटी ७७ लाख रुपये खर्च केला जाईल.
याशिवाय कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम आणि कल्याण ग्रामीणमधील २७ गावे धरुन १२ कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार केला गेला आहे. त्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यावर अधिक भर दिला गेला आहे.
वाढीव पाणी केव्हा मिळणार?
मोरबे धरण झाल्यावर कल्याण-डोंबिवलीला वाढीव पाणी मिळणार होते. पण ते धरण नवी मुंबई महापालिकेने खरेदी केले. बारवी धरणाची उंची वाढविल्यावर धरणातील पाणीसाठा दुप्पट होणार आहे. पण तो विषयही रेंगाळला आहे. मोरबे धरुन पूर्ण होऊनही बारवी आणि आंध्र धरणातून उल्हास नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यापैकी ५९ दशलक्ष लिटर पाणी हे अजूनही नवी मुंबईला दिले जाते. हे पाणी कल्याण-डोंबिवलीला देण्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी तत्वत: मान्यता दिली होती. त्याचा जीआर अद्याप निघालेला नसल्याने हे वाढीव पाणी कल्याण-डोंबिवलीला मिळालेले नाही, असे महापौर राजेंद्र देवेळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महापालिकेची लोकसंख्या १५ लाख ५० हजार आहे. उल्हास नदीपात्रातून महापालिका दररोज ३०० दशलक्ष लिटर पाणी उचलते. उल्हास नदीत बारवी व आंध्र धरणातून पाणी सोडले जाते. बारवी धरण यंदा पूर्ण भरलेले नाही.
आंध्र धरण ५० टक्केच भरले. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत ३० टक्के पाणीकपात लागू आहे. या कपातीमुळे मंगळवारी आणि शनिवारी महापालिका हद्दीत पाणी पुरवठा बंद असतो.
२७ गावांचा पाणी पुरवठा एमआयडीसीकडे असल्याने तो गुरुवार व शुक्रवार असा दोन दिवस बंद असतो. २७ गावांकडे पाणी साठवण टाक्या नाहीत. त्यामुळे तेथे पाण्याची समस्या अधिक तीव्रतेने जाणवते.
उल्हास नदीतून ज्या विहीरीतून पाणी उचलले जाते, तेथून एमआयडीसी ७७० दशलक्ष लिटर, तर महापालिका ३०० दशलक्ष लिटर पाणी उचलते. अन्य दिवशी पाणी उचलल्यास त्या विहिरीतून पाणी ओव्हरफ्लो होते. त्यामुळे १५० दशलक्ष लिटर पाण्याची नासाडी होऊ शकते.
पाऊस पडला नाही म्हणून यंदा धरणे भरली नाहीत. त्यामुळे टंचाई आहे. पालिकेने जवाहराल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत २४ तास पाणी पुरवठयाची योजनात तयार केली होती. ही योजना १८२ कोटी रुपये खर्चाची होती. २४ तास पाणी पुरवठ्याची योजना महापालिकेने दुसऱ्या टप्प्यात सादर केली.
पहिल्या टप्प्यात १५० दशलक्ष लिटरची पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण योजना, शहरी गरीबांसाठी घरकूल योजना अर्थात बीएसयूपी या योजना सादर केल्या होत्या. त्याला पहिल्या टप्प्यात निधी मिळाला. त्यातील योजना नीट पूर्ण न झाल्याने २४ तास पाणी पुरवठ्याची योजना रखडली. ंईाता सरकार बदलल्याने जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानाच्या जागी अटल अमृत योजना लागू झाली.
यापूर्वीची १५० दशलक्ष लिटरची योजना तयार करताना २७ गावांचा विचार केलेला नव्हता. तेव्हा गावे महापालिकेत नव्हती. आता गावे महापालिकेत आल्याने अमृत योजनेअंतर्गत २७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा नवा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे.