नारायण जाधव
नवी मुंबई - सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबईच्या लोकसंख्या वाढीचा वेग राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत काहीसा जास्त आहे. येथील टीटीसी औद्योगिक वसाहतीतील आयटी उद्योग, डेटा सेंटर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह कोकण भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, विविध बँकांची विभागीय कार्यालयांसह बांधकाम उद्योग आणि शिक्षण संस्थांच्या जाळ्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या सध्या साडेअठरा ते वीस लाखांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि एमआयडीसीत निवासी बांधकामांना परवानगी दिल्याने नजीकच्या भविष्यात नवी मुंबई शहर लवकरच २५ लाखांवर जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महापालिकेचे अंदाजपत्रकही पाच हजार कोटींवर गेले आहे. या शिवाय नजीकच्या पनवेल आणि उरणच्या जेएनपीएचा पसाराही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
एमआयडीसीमुळे वाहनांचा भार
एपीएमसी मार्केट, औद्योगिक क्षेत्रात दररोज नवी मुंबईत आठ ते दहा हजारांच्या आसपास अवजड वाहनांची ये-जा असते. याशिवाय कळंबोलीचे स्टील मार्केट, जेएनपीए, तळोजा औद्योगिक वसाहत याठिकाणी ये-जा करणारी असंख्य अवजड वाहने नवी मुंबईतून मुंबई, ठाणेसह महामुंबईतील इतर शहरांत ये-जा करतात.
उल्हासनगरात सर्वाधिक गर्दी
उल्हासनगरच्या लोकसंख्येची घनता मुंबई, नवी मुंबई व ठाणे शहरांपेक्षा जास्त असल्याचे धक्कादायक वास्तव एमएमआरडीएने आपल्या २०१६ ते २०३६ या अहवालात समोर आणले आहे. नवी मुंबईत ती १०,३१५ आहे.
नवी मुंबई होणार ४१ लाखांची
२०११ साली झालेल्या जनगणनेत नवी मुंबईची लोकसंख्या ११ लाख २० हजार ५४७ होती. दहा वर्षांत त्यात सहा लाखांची भर पडल्याचा अंदाज आहे. मात्र, राज्य सरकारने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केल्याने विकासकांना विकत वाढीव चटई निर्देशांक घेण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे नवी मुंबईत सध्या पाच ते सहा वाढीव एफएसआयने टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. यात पुढील १२-१५ वर्षांत मोठी भर पडणार आहे. यामुळेच येत्या दहा वर्षांत शहराची लोकसंख्या किमान २८ तर कमाल ४१ लाखांपर्यंत वाढू शकते, असे विकास आराखडा सांगतो.