नवी मुंबई : विमानतळाच्या कामात खंड पडणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 02:27 AM2018-01-08T02:27:45+5:302018-01-08T02:29:38+5:30

देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे.

Navi Mumbai: The work of the airport will not break! | नवी मुंबई : विमानतळाच्या कामात खंड पडणार नाही!

नवी मुंबई : विमानतळाच्या कामात खंड पडणार नाही!

Next

कमलाकर कांबळे
नवी मुंबई : देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे. परंतु शनिवारी उलवे टेकडीच्या उत्खननासाठी पेरलेल्या सुरुंगाच्या स्फोटात सहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे या उत्खननाच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांचा असलेला विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी विमानतळाच्या कामात कोणताही खंड पडू दिला जाणार नाही, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
माहिती व तंत्रज्ञानाचे एक आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली आहे. आता प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची भर पडली आहे. विमानतळ प्रकल्पामुळे नवी मुंबईला ख-या अर्थाने ग्लोबल लूक प्राप्त होणार आहे. देशातील पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणून या विमानतळाला मान मिळणार आहे. या विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. या विमानतळाच्या उभारणीसाठी जीव्हीके या कंपनीची ठेकेदार म्हणून निवड करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन हजार कोटी रुपयांची प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आली आहे. यात नदीचे पात्र बदलणे, उलवे टेकडीची उंची कमी करणे, उच्च विद्युत दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आणि जमिनीचे सपाटीकरण आदी कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.
विशेष म्हणजे भूसंपादन आणि पुनर्वसनाचा प्रश्न सुध्दा मार्गी लागला आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात असणाºया दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे, परंतु वरचे ओवळा गावातील ग्रामस्थांचा स्थलांतराला संमिश्र विरोध आहे. टेकडीच्या उत्खननामुळे गावांतील घरांना तडे जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या विरोधात येथील ग्रामस्थांनी तीन दिवसांपूर्वी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर मोर्चा काढला होता. यातच ही दुर्घटना घडल्याने हा विरोध आणखी तीव्र होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
तसे झाल्यास टेकडी उत्खननाच्या कामाला खीळ बसून त्याचा फटका संपूर्ण विमानतळ प्रकल्पाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी प्रकल्पपूर्व कामांत कोणताही खंड पडू दिला जाणार नाही, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सहकार्य करण्याचे सिडकोचे आवाहन उलवे टेकडीचे काम अत्यंत नियोजनबद्धरीत्या सुरू आहे. हे काम अत्यंत जोखमीचे असल्याने सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत आहे. त्यातही शनिवारची दुर्दैवी घटना घडली. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गावांनी स्थलांतरित होणा-या गावांतील अनेक ग्रामस्थांनी संमतीपत्रे दिली आहेत. पुनर्वसन आणि पुन:स्थापन योजनेअंतर्गतचा लाभ ही स्वीकारला आहे. त्यानंतरही प्रत्यक्ष स्थलांतर केले जात नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब विमानतळ प्रकल्पाच्या मार्गात अडथळा निर्माण करणारी असल्याने ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी केले आहे.

Web Title: Navi Mumbai: The work of the airport will not break!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.