Navi Mumbai: आर्थिक वादातून तरुणाचे केले अपहरण, पोलिसांनी नागपूरमधून केली तरुणाची सुटका
By सूर्यकांत वाघमारे | Published: January 19, 2024 11:14 PM2024-01-19T23:14:19+5:302024-01-19T23:22:44+5:30
Navi Mumbai Crime News: टॅटो काढण्यासाठी डोंबिवली येथून कोपर खैरणेत आलेल्या तरुणाच्या अपहरणाची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून अपहरण झालेल्या तरुणाची नागपूरमधून सुटका केली आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर येत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
नवी मुंबई - टॅटो काढण्यासाठी डोंबिवली येथून कोपर खैरणेत आलेल्या तरुणाच्या अपहरणाची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून अपहरण झालेल्या तरुणाची नागपूरमधून सुटका केली आहे. आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर येत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
डोंबिवलीच्या पलावा येथे राहणाऱ्या आदित्य तिवारी (२२) याचे रविवारी कोपर खैरणेतून अपहरण झाले होते. रविवारी दुपारी तो दोन मित्रांसह कोपर खैरणे सेक्टर ८ येथे टॅटो काढण्यासाठी आला होता. यावेळी अगोदरच तिथे असलेल्या एकाने आदित्य तिवारीला धमकावून कारमध्ये बसवून घेऊन गेले होते. त्यानंतर मात्र त्याच्याशी संपर्क न झाल्याने मित्रांनी त्याच्या अपहरणाची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानुसार कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षानेही तपासाला सुरवात केली होती. त्यासाठी सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांनी सहायक निरीक्षक हर्षल कदम, श्रीनिवास तुंगेनवार, शशिकांत पवार, उपनिरीक्षक संजय रेड्डी, हवालदार निलेश किंद्रे, अनिल यादव, महेश पाटील व सतीश चव्हाण आदींचे पथक केले होते. त्यांनी घटनास्थळावरून सीसीटीव्हीद्वारे दोन कारचा नंबर मिळवला होता. त्यानुसार तांत्रिक तपास व कारचा सुगावा घेऊन अपहरणाचा कट रचणाऱ्या दोघानं ताब्यात घेतले. त्यांनी त्यांच्या इतर तीन साथीदारांकडे तिवारी याला डांबून ठेवले होते. मात्र दोन साथीदार पोलिसांच्या हाती लागल्याचे समजताच ते तिघेही पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक करून अपहरण झालेल्या आदित्य तिवारीची सुटका केली. आदित्य व दोन प्रमुख अपहरणकर्ते यांच्यात जुनी ओळख असून त्यांच्यात आर्थिक वाद सुरु होते. मार्केटिंग कंपन्यांवरून हा वाद असल्याचे देखील समजते. यातून त्यांनी आदित्यवर पाळत ठेवून अपहरणाचा कट रचला होता.