अळ्यांच्या उपद्रवाने नवी मुंबईकर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 06:19 AM2019-10-11T06:19:25+5:302019-10-11T06:19:42+5:30
अंगावर पडलेल्या अळ्यांमुळे शरीराला खाज सुटत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
नवी मुंबई : सीवूड परिसरातील नागरिक दोन दिवसांपासून अळ्यांमुळे त्रस्त झाले आहेत. रस्ता, नागरी वसाहत व वृक्षांवरही हजारो अळ्या आल्या आहेत. अंगावर पडलेल्या अळ्यांमुळे शरीराला खाज सुटत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
हवामानातील बदलामुळे खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीमध्ये हायब्लिया केटर या सुरवंटाशी साधर्म्य असलेल्या अळ्या मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. या अळ्यांचे प्रमाण सीवूड सेक्टर ४८ व ५० मध्येही वाढले आहे. या परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंती, रस्त्याच्या बाजूला असलेले वृक्ष व रस्त्यांवरही अळ्यांचा थर दिसतो आहे. रस्त्याला लागून असलेल्या वृक्षांवरून अळ्या खाली पडत असून दुचाकीस्वारांचे लक्ष विचलित होऊ लागल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अळ्या चावल्यामुळे शरीराला खाज सुटत असून लालसर व्रण उमटू लागले आहेत. गुरुवारी सकाळी सीवूड परिसरात सर्वत्र अळ्या दिसू लागल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खारफुटीला पानगळती सुरू झाली की, लिप डिफॉलीटर व हायब्लिया केटर ही फुलपाखरे तयार होत असतात. सीवूड परिसरामध्येही फुलपाखरांच्या अळ्या (सुरवंट) आढळून आल्या आहेत. त्यामुळे धोका नाही. तीन ते चार दिवसांमध्ये त्यांचे फुलपाखरांमध्ये रूपांतर होईल.
- दादासाहेब कुकडे, वनपरिक्षेत्रपाल अधिकारी, नवी मुंबई