उंचच उंच दहीहंडीला नवी मुंबईकरांची बगल; पूरस्थितीमुळे मानाच्या हंडी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 01:08 AM2019-08-23T01:08:55+5:302019-08-23T01:09:14+5:30

सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी लाख रुपये किमतीच्या व उंच हंडी उभारण्याची प्रथा सुरू केली होती.

Navi Mumbaikar next to the high dahi handi | उंचच उंच दहीहंडीला नवी मुंबईकरांची बगल; पूरस्थितीमुळे मानाच्या हंडी रद्द

उंचच उंच दहीहंडीला नवी मुंबईकरांची बगल; पूरस्थितीमुळे मानाच्या हंडी रद्द

Next

- वैभव गायकर

पनवेल : दहीहंडीसाठी थरावर थर रचण्याच्या स्पर्धेमुळे प्रत्येक वर्षी अनेक गोविंदांना जीव गमवावा लागतो, यामुळे उत्सवाला गालबोट लागत असल्यामुळे नवी मुंबईसह पनवेलमधील अनेक नामांकित मंडळांनी उंचीचा मोह सोडला आहे. राज्यातील पूरस्थितीमुळेही अनेकांनी दहीहंडी उत्सव रद्द करून इतर मंडळांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
मुंबई व ठाणेप्रमाणे नवी मुंबईमध्येही दहीहंडी उत्सव उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली होती. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी लाख रुपये किमतीच्या व उंच हंडी उभारण्याची प्रथा सुरू केली होती. हंडी फोडण्यासाठी मुंबई व ठाणेमधील नामांकित पथकेही नवी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली होती; परंतु उत्सवाच्या दरम्यान होणारे अपघात व गोविंदांच्या मृत्यूच्या घटनांमुळे शासनाने उंचीवर निर्बंध आणले. १८ वर्षांखालील गोविंदांचा सहभाग नसावा, अशी अट घातली. २०१७ मध्ये ऐरोलीमध्ये विजेचा धक्का लागून एक गोविंदाचा मृत्यू झाला. पोलिसांनीही सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून रोडवरील उत्सव मैदानात हलविण्यास भाग पाडले. या सर्वांचा परिणाम होऊन अनेक मंडळांनी त्यांच्या दहीहंडी रद्द करण्यास सुरुवात केली. बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांनीही यापूर्वीच मोठ्या दहीहंडी रद्द केल्या आहेत. गतवर्षी मराठा क्रांती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोपरखैरणे व इतर ठिकाणच्या मंडळांना उत्सव रद्द करण्याचे आवाहन केले होते. पोलिसांच्या विनंतीला मान देऊन सर्वात प्रतिष्ठेची वनवैभव कला क्रीडा मंडळाची हंडी रद्द केली होती.
या वर्षी सातारा, सांगली, कोल्हापूर व कोकणातील काही ठिकाणी पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे नवी मुंबई व पनवेलमधील अनेक मंडळांनी हंडी रद्द केल्या आहेत. यामध्ये सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनची ऐरोलीमधील हंडीही रद्द केली असून, मंडळाचे प्रमुख विजय चौगुले यांनी पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. वन वैभव कला क्रीडा मंडळाचे वैभव नाईक यांनीही पूरग्रस्तांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे. वाशीमधील श्री गणेश बालगोपाल मित्रमंडळानेही पूरग्रस्तांना मदत करून नवीन आदर्श निर्माण केला आहे. पनवेल परिसरामध्येही ८० पेक्षा जास्त ठिकाणी उत्सव साजरा केला जाणार आहे. खारघर, कळंबोली, पनवेल व इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात दहीहंडी सण साजरा केला जातो. पनवेलमध्ये नवी मुंबई व इतर ठिकाणावरून दहीहंडी पथके येत असतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गंभीर परिस्थितीत आम्ही पारितोषिकांची काही रक्कम सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना सुपूर्द करणार असल्याची माहिती घणसोलीमधील संस्कार मित्रमंडळ दहीकाला उत्सवाचे अध्यक्ष अंकुश पांडुरंग नाईक यांनी दिली.

बापटवाड्यात पारंपरिक उत्सव
पनवेल शहरातील बापटवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवाला १०० वर्षे होऊन गेली आहेत. या ठिकाणी साजरा होणारा उत्सव पाहण्यासाठी शहरवासीही गर्दी करत असतात. लाखो रुपयांची बक्षिसे व उंचीच्या थराराची प्रथा इतर ठिकाणी रूढ होत असताना बापटवाड्यात मात्र जुनी परंपरा जपण्याचा प्रयत्न सुरू आहे.

घणसोलीमध्ये ११७ वर्षांची परंपरा
नवी मुंबईमधील घणसोली गावातील उत्सवाला ११७ वर्षांची परंपरा आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे गाव असलेल्या घणसोलीमध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या काळात हा उत्सव सुरू करण्यात आला. आठ दिवस २४ तास अखंडपणे गावातील हनुमान मंदिरामध्ये भजन सुरू असते. दहीहंडी दिवशी गावात अनेक ठिकाणी हंडी उभारण्यात येतात. या हंडी फोडण्याचा मान प्रत्येक वर्षी एका आळीतील तरुणांना मिळतो. या वर्षीचा मान म्हात्रे आळीला देण्यात आला आहे. पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करून ग्रामस्थांनी इतर मंडळांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

अशी आहे नियमावली
- १८ वर्षांखालील गोविंदाचा सहभाग नसावा
- २० फुटापेक्षा अधिक उंचीची दहीहंडी नसावी
- सुरक्षिततेची उपकरणे अत्यावश्यक
- मानवी मनोºयावर पाण्याचा मारा करू नये
- कच्च्या, जुन्या इमारतीला दहीहंडी बांधू नये
- कायदा सुव्यवस्थेची खबरदारी घ्यावी
- दहीहंडीच्या ठिकाणी कर्कश डीजेचा वापर शक्यतो टाळावा
- उत्सवाच्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था असावी

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन सर्व उत्सव मंडळांना देण्यात आले आहे. हंडीच्या ठिकाणी मॅट टाकण्यात यावी. सर्व गोविंदांचा विमा काढण्यात यावा. सर्वांना सिक्युरिटी जॅकेट व हेल्मेट देण्यात यावे व इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
- संजय कुमार, पोलीस आयुक्त, नवी मुंबई

घणसोली गावात ११७ वर्षे अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आहे. आठ दिवस २४ तास मंदिरात भजन केले जाते. घणसोली गावाची एक मानाची हंडी असते. हंडी जास्त उंचीवर बांधली जात नाही. या वर्षी मानाची हंडी फोडण्याचा मान म्हात्रे आळीला आहे. स्मार्ट सिटीमध्येही ग्रामस्थांनी जुनी परंपरा कायम ठेवली आहे.
- शेखर मढवी, उपाध्यक्ष,
श्री देवस्थान संस्था (गावकी)घणसोली

Web Title: Navi Mumbaikar next to the high dahi handi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.