लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सिडकोने शुक्रवारी तळोजामध्ये मेट्रो रेल्वेची यशस्वीपणे चाचणी केली. ८५० मीटर लांबीच्या मार्गावर ६५ किलोमीटर प्रतितास वेगाने मेट्रोची चाचणी घेण्यात आली. डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत प्रत्यक्षात मेट्रो धावणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.
नवी मुंबईमध्ये सिडकोच्या वतीने चार टप्प्यांत मेट्रो रेल्वेचे काम करण्यात येत आहे. ९ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करून २६ किलोमीटर लांबीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बेलापूर ते पेंधरदरम्यान ११ किलोमीटरचा पहिला टप्पा, खांदेश्वर ते तळोजा एमआयडीसी दुसरा टप्पा, पहिल्या दोन टप्प्यांना जोडणारा तिसरा टप्पा व खांदेश्वर ते विमानतळापर्यंत चौथा टप्पा असणार आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा लवकर सुरू करण्यासाठी सिडकोच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी तळोजा आगाराच्या प्रवेशद्वारावरील मार्गाजवळ मेट्रोची फेरचाचणी घेण्यात आली. मेट्रो ७५० मीटर लांबीच्या मार्गावर धावली. सुरक्षेसाठी मेट्रोचा वेग ६५ किलोमीटर प्रतितास ठेवण्यात आला होता. चाचणी यशस्वी झाली आहे. यापूर्वी सिडकोने मेट्रोची यशस्वी चाचणी केली होती. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे सुरक्षाविषयी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पहिल्या टप्यातील ७ ते ११ स्थानकादरम्यान डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत प्रत्यक्षात मेट्रो सुरू होणार आहे. १ ते ७ स्थानकादरम्यान डिसेंबर २०२२ पर्यंत मेट्रो धावणार आहे.
सिडकोने बेलापूर ते पेंधरदरम्यान पहिल्या मार्गावर लवकर मेट्रो सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशची नियुक्ती केली आहे. महा मेट्रोकडून २३ फेब्रुवारी रोजी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी २० तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना केली आहे. लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे सिडकोेने स्पष्ट केले आहे.
नवी मुंबईकरांना सर्वोत्तम पायाभूत सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान उंचावण्यास सिडकोने नेहमीच प्राधान्य दिले आहे. म्हणून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोची चाचणी यशस्वी झाली असून, प्रत्यक्षात या मार्गावर लवकरच मेट्रो धावेल.- डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
नवी मुंबई सिडकोचा तपशीलटप्पा कॉरिडाॅर लांबी स्थानकेटप्पा १ बेलापूर ते पेंधर ११.१० किमी ११टप्पा २ खांदेश्वर ते तळोजा एमआयडीसी ७.१२ ६टप्पा ३ टप्पा १ व २ मधील अंतरजोड ३.८७ ३टप्पा ४ खांदेश्वर ते विमानतळ ४.१७ १