नवी मुंबईकरांचे ग्रामदेवीपुढे साकडे
By admin | Published: October 19, 2015 01:32 AM2015-10-19T01:32:32+5:302015-10-19T01:32:32+5:30
गोवर्धनी माता ठाणे-बेलापूर पट्टीमधील बेलापूर इथल्या किल्ल्यावर असलेल्या गोवर्धनी मातेच्या मंदिरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.
नवी मुंबई : गोवर्धनी माता ठाणे-बेलापूर पट्टीमधील बेलापूर इथल्या किल्ल्यावर असलेल्या गोवर्धनी मातेच्या मंदिरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. नोकरी-धंद्यासाठी मुंबई-ठाणे व आजूबाजूच्या परिसरात स्थलांतरित झालेले इथले रहीवासी नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं गोवर्धनी मातेच्या दर्शनाला आवर्जून येतात आणि नऊ दिवस भजन-किर्तन व भक्तीरसात न्हाऊन निघतात. दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी रेतीबंदर परिसरात मासेमारी करताना रामा चिमाजी भगत यांना गोवर्धनी मातेची पाषाण मूर्ती सापडली. यानंतर देवीने भगत यांना दृष्टांत देऊन किल्ले गावठाण येथे स्थापना करण्यात आली. या परिसरात ग्रामस्थ गाई चारण्यासाठी आणत असल्याने या देवीला गोवर्धनी माता असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. ही माता आगरी-कोळी व ब्राह्माणांची कुलस्वामिनी आहे. मातेचे जुने मंदिर दगडी बांधकामाचे होते. १९५२ साली येथे श्री गोवर्धनी माता मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ट्रस्टच्या माध्यमातून मातेची सर्व वैदिक व नित्य पूजा करण्यात येऊ लागली. मंदिराचे बांधकाम दाक्षिणात्य पध्दतीने असून प्रशस्त असा सभामंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी असलेल्या गाभा-यात मातेची पूर्वाभिमुख चांदीचा मुखवटा असलेली प्रसन्नमुदा असून जवळ गाईचीही मूर्तीआहे. मातेच्या डाव्या हाताला गणपती व उजव्या हाताला हनुमानाची मूर्ती आहे. मंदिरात सकाळी सात वाजता आरती, अभिषेक नित्य पूजा चालते. आमदार मंदा म्हात्रे यांच्या वतीने गोवर्धनी माता मंदिर परीसरात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
नेरूळची गावदेवी
नेरूळ सेक्टर १२ परिसरातील गावदेवी मंदिरातही शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नेरूळ ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या या गावदेवी मंदिरात मोठ्या श्रद्धेने देवीची पूजाअर्चा केली जाते. या काळातील भजन तसेच गायन - वादनाच्या संगीत मैफिलीने गावातील सर्वच भक्त तल्लीन होतात.
वाशीची मरीआई माता
वाशी येथील मरीआई म्हणजे नवी मुंबईतील प्रसिध्द ग्रामदैवत आहे. जुहुगावच्या प्रवेशद्वाराजवळच मरीआई देवीचे मंदिर आहे. २०० वर्ष पुरातन मंदिरात देवीचीजीो मूर्तीचे सौंदर्य पाहण्याजोगे आहे. माता मरीआई मंगलगौरी जुहूवासीयांचे श्रध्दास्थान असून नवरात्रोत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा लागलेल्या पहायला मिळतात. या गावच्या ग्रामदेवीचे महात्म्य सांगतांना इथल्या देवीचे स्मरण करु नच गावातील शुभकार्याची सुरु वात केली जाते. नवरात्रोत्सवात संपुर्ण मंदिर परिसराला रोषणाई करुन फुलांनी सजविण्यात येते. भाविकांसाठी भजन, कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले या ठिकाणी करण्यात आले आहे.
सीबीडीची सप्तशृंगी
सीबीडीतील सप्तशृंगी माता मंदिरातही मोठ्या थाटामाटात नवरात्रौत्सवाचे आयोजन केले आहे. खानदेश एकता मित्र मंडळ आणि सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्ट सीबीडी
सेक्टर ८च्या वतीने नवरात्रीनिमित्त महिला व मुलांसाठी विविध उपक्रम, धार्मिक कार्यक्रम, दुर्गा सप्तशती पठण, भोंडला, होम, सत्यनारायण पूजा तसेच महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.